नवी दिल्ली : गेल्यावर्षीच्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली रु. 2000 ची नोट पुन्हा बंद होते की काय अशा शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी हा अंदाज कुठल्याही व्हायरल व्हॉट्सअॅप पोस्टमधून किंवा स्वयंघोषित अर्थतज्ज्ञाने व्यक्त केलेला नाही, तर स्टेट बँकेच्या एका अहवालातून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
स्टेट बँकेच्या काल जारी झालेल्या एका शोधअभ्यास अहवालात, संसदेत अर्थमंत्र्यांनी चलनविषयक सांगितलेली अधिकृत माहिती आणि रिझर्व बँकेने वेळोवेळी चलनस्थिती विषयी जारी केलेले अहवाल, यांचा तुलनात्मक अभ्यास करुन आपले निष्कर्ष नोंदवले आहेत. मात्र स्टेट बँकेच्या अहवालात कोणताही ठोस निष्कर्ष किंवा मत व्यक्त न करता फक्त काही शक्यता सूचित करण्यात आल्या आहेत.
स्टेट बँकेच्या अहवालानुसार 2463 अब्ज रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा छापून तयार आहेत, मात्र त्या अजून चलनात जारी केलेल्या नाहीत.
नोटाबंदीनंतर ज्या प्रमाणात व्यवहारात रु. 2000 च्या नोटा दिसायच्या तेवढ्या हल्ली दिसत नाहीत, हे तसं सर्वसामान्य निरीक्षण. काही स्वयंघोषित अर्थतज्ज्ञांनीही रु. दोन हजारची नोट ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे दावे केले होते. त्यातच मधल्या काळात रिझर्व बँकेने रु. 2000 च्या नोटांची छपाई बंद केल्याचीही बातमी आली होती. त्यानुसार रु. 2000 ची नोट बंद होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावर अर्थमंत्र्यांनी संसदेतच दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली असली तरी, ही नोट बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट केलं होतं.
रिझर्व बँकेने रु. 200 ची नवी नोट जारी केल्यानंतरही दोन हजारची नोट बंद होणार असल्याची चर्चा होती, त्यावेळीही रिझर्व बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.
नोटा छापून तयार, मात्र चलनात नाही!
स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ सौम्यकांती घोष यांच्या नेतृत्वाखालील रिसर्च टीमने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चलनस्थिती विषयक संसदेत वेळोवेळी दिलेली माहिती आणि रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेले अहवाल यांचा तुलनात्मक अभ्यास करुन काही शक्यता सूचित केल्या आहेत. त्यानुसार रिझर्व बँकेकडे दोन रुपयांच्या नोटा छापून तयार आहेत, मात्र त्या अजून व्यवहारासाठी जारी केलेल्या नाहीत.
किती नोटांची छपाई?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केलेल्या निवेदनानुसार, 8 डिसेंबरपर्यंत 7308 अब्ज रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्याचवेळी रिझर्व बँकेने जारी केलेल्या एका अहवालानुसार, मार्च 2017 पर्यंत 3501 अब्ज रुपये किंमतीच्या छोट्या नोटा (म्हणजेच रुपये 500 च्या आतील मूल्याच्या नोटा) चलनात आहेत
त्याचवेळी अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रिझर्व बँकेने 8 डिसेंबरपर्यंत पाचशे रुपये मूल्याच्या 16957 दशलक्ष (1695.7 कोटी नोटा ) नोटांची आणि दोन हजार रुपये मूल्याच्या 3654 दशलक्ष (365.4 कोटी नोटा) नोटांची छपाई केलेली आहे. या मोठ्या किंमतीच्या दोन्ही नोटांचं एकूण मूल्य 15787 अब्ज रुपये होतं.
त्याचवेळी रिझर्व बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चलनात असलेल्या उच्च मूल्याच्या म्हणजे पाचशे आणि दोन हजाराच्या नोटांची किंमत 13324 अब्ज रुपये होती.
याचाच अर्थ 15787 अब्ज वजा 13324 अब्ज रुपये म्हणजेच 2463 अब्ज रुपये किंमतीच्या उच्च मूल्याच्या नोटा अजूनही रिझर्व बँकेकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही कुठेही फारशी चलनटंचाई जाणवत नाही. याचाच अर्थ दरम्यानच्या काळात रिझर्व बँकेने रुपये 50 आणि 200 च्या नव्या नोटा जारी करुन ही तूट भरुन काढलेली असावी. कारण जवळपास अडीच हजार अब्ज रुपये किंमतीच्या नोटा रिझर्व बँकेकडे असूनही चलनतुटवडा जाणवत नाही.
छोट्या नोटांचं प्रमाण वाढलं
रिझर्व बँकेने दोनशे आणि पन्नास रुपयांची नवी नोट जारी केल्यामुळे तसंच शंभर रुपये आणि त्याखालील मूल्यांच्या नोटांची अतिरिक्त छपाई केल्यामुळे सध्या चलनात छोट्या मूल्यांच्या नोटांची म्हणजेच पाचशे रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या नोटाचं प्रमाण हे जवळपास 35 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. नोटाबंदीच्या वेळी उच्च मूल्याच्या नोटाचं अर्थव्यवस्थेतील प्रमाण हे 85 टक्क्यांपर्यंत होतं, म्हणजेच छोट्या नोटाचं प्रमाण हे फक्त 15 टक्क्यांच्या आसपास होतं. ते आता वाढून जवळपास 35 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.
नोटाबंदीच्या वेळी कमी मूल्याच्या नोटाचं चलनातील प्रमाण खूप कमी असल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना अभूतपूर्व चलनटंचाईचा सामना करावा लागला होता.
आता दोन हजाराची नोट बंद होणार की नाही, यावर फक्त रिझर्व बँकच अधिकृत घोषणा करु शकते. मात्र रिझर्व बँकेने आपला फोकस छोट्या मूल्याच्या नोटांकडे वळवला आहे, हे मान्य करावंच लागेल.
2000 रुपयांच्या नोटा छापून तयार, मात्र पुरवठा बंद : अहवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2017 09:06 AM (IST)
स्टेट बँकेच्या अहवालानुसार 2463 अब्ज रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा छापून तयार आहेत, मात्र त्या अजून चलनात जारी केलेल्या नाहीत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -