नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक युद्ध अजून सुरुच आहे. भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. दोन्ही राज्यांचा निकाल लागला तेव्हा राहुल गांधी सिनेमा पाहण्यात व्यस्त होते, असा आरोप भाजपने केला आहे.


भाजपच्या या आरोपांनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. ''एवढा संकुचित विचार का आहे? हे कुणाच्या वैयक्तिक जीवनात लक्ष दिल्यासारखं आहे. कुणी हनीमून साजरा करत असेल तर त्यातही तुम्ही दखल देणार का?'' असा सवाल सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2013 सालच्या एका ट्वीटचा हवाला देत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. ''प्रत्येकाने अशा गोष्टींसाठी वेळ काढायला पाहिजे. एखाद मूर्खच अशा गोष्टींना विरोध करु शकतो'', असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

''गुजरातचे सर्व आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयमॅक्स 3D थिएटरमध्ये सिनेमाला घेऊन जात आहे'', असं ट्वीट मोदींनी 2013 साली केलं होतं.

काय आहे प्रकरण?

गुजरात आणि हिमाचलच्या निकालानंतर राहुल गांधी स्टार वॉर या सिनेमाला गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र हा मुद्दा मोठा होऊ शकतो, असं समजल्यानंतर राहुल गांधी अर्ध्यातूनच सिनेमा सोडून परत आले, असं बोललं जात होतं.

''गुजरात विसरुन जा, काँग्रेसने हिमाचल प्रदेशही गमावलं आणि राहुल गांधी स्टार वॉर पाहण्यात व्यस्त होते'', असं ट्वीट भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केलं होतं.

''राहुल गांधींनी सिनेमा पाहण्याऐवजी गुजरात आणि हिमाचलमधील पक्षाच्या कामगिरीचं आकलन केलं असतं तर त्यांना समजलं असतं, की सौराष्ट्र, जिथे काँग्रेसने भाजपपेक्षा जास्त जागा जिंकल्या तिथे भाजपच्या मतांची टक्केवारी जास्त होती'', असं आणखी एक ट्वीट मालवीय यांनी केलं.