Indian Currency Notes: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर भगवान गणेश आणि लक्ष्मीची छायाचित्रे प्रकाशित करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले होते. यावर येणाऱ्या प्रतिक्रियांवर आम आदमी पक्षाचे नेते नरेश बालियान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'लक्ष्मी-गणेशाची अडचण होत असेल तर पाकिस्तानात निघून जा ', असे ते म्हणाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.


यावर भाजप आणि काँग्रेस नेत्यांची एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया समोर येत आहेत. केजरीवाल यांच्या या आवाहनानंतर नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. या वक्तव्या संदर्भात आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियान यांनी प्रत्युतर देत 'गणेश-लक्ष्मीची अडचण असेल तर पाकिस्तानात निघून जा', असे म्हटले आहे.


अरविंद केजरीवाल यांनी सुचवले आहे की नवीन नोटांवर एका बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला भगवान गणेश आणि लक्ष्मी यांचे चित्र छापले जाऊ शकते. ते म्हणाले, “देव-देवतांचा आशीर्वाद आपल्यावर नसेल तर अनेक वेळा प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. मी पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या चलनी नोटांवर गणेश आणि लक्ष्मीचे चित्र छपावे.




इंडोनेशिया हे करू शकतो तर आपण का करू शकत नाही? : केरीवाल 


केजरीवाल म्हणाले आहेत की, “आपल्या चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे चित्र असेल तर आपला देश प्रगती करेल. मी एक-दोन दिवसांत या विषयावर पंतप्रधानांना पत्र लिहीन. केजरीवाल यांनी इंडोनेशियाचे उदाहरण देत म्हटलं की, इंडोनेशिया मुस्लीम देश आहे आणि त्यांच्या चलनी नोटेवर गणपतीचे चित्र आहे. असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “जर इंडोनेशिया हे करू शकतो, तर आपण का करू शकत नाही? या प्रतिमा नवीन चलनी नोटांवर छापल्या जाऊ शकतात."


भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा उल्लेख करताना केजरीवाल म्हणाले की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे देश गंभीर परिस्थितीतून जात आहे. ते म्हणाले, “भारत समृद्ध व्हावा आणि येथील प्रत्येक कुटुंब समृद्ध व्हावे अशी आपल्या सर्वांना इच्छा आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणावर शाळा आणि रुग्णालये उघडायची आहेत.''