मुंबई: तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार की तितकाच कायम राहणार याचा निर्णय उद्या होणाऱ्या आरबीआयच्या (RBI) पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून बुधवारपर्यंत चालणार आहे. बुधवारी म्हणजे उद्या सकाळी रेपो दरात (Repo Rate) वाढ होणार की तितकाच राहणार याचा फैसला होणार आहे. त्यामुळे आरबीआयच्या निर्णयाकडे उद्योग जगतासोबतच सर्वसामान्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे. 


रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) मागील तीन बैठकांमध्ये प्रत्येक वेळी व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आताही त्यामध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


देशातील ऑक्टोबरमध्ये महागाई दर 6.77 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तरीही तो RBIच्या वर्षभरातील 2 ते 6 टक्के या निर्धारित दरापेक्षा तो जास्त आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर सरासरी 6.7 टक्के असेल आणि 2023-24 या आर्थिक वर्षात 5.2 टक्क्यांपर्यंत घसरेल अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महागाई दर अद्याप पूर्ण नियंत्रणात आला नसल्याने उद्या आरबीआय पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची जास्त शक्यता आहे असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. 


रिझर्व्ह बँकेने या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र असे असतानाही जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या वरती राहिली आहे. त्यामुळे आताही महागाई दर नियंत्रित ठेवण्यासाठी यावेळीही व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. 


रेपो रेट म्हणजे काय?


ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर (Repo Rate) म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate)म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा जमा करतात. त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिर्व्हस रेपो दर म्हणतात. रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो. 


ही बातमी वाचा :