मुंबई: जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) विकास दर अंदाज 6.5 टक्क्यांवरून 6.9 टक्के केला आहे. जागतिक बँकेने नुकताच आपला ताजा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार अमेरिका, युरोझोन आणि चीनमधील घडामोडींचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात सरकार 6.4 टक्क्यांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठेल असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई 7.1 टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.


बिघडलेल्या बाह्य वातावरणात 2022-23 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 6.9 टक्के असू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. हा अंदाज बरोबर असला तरी आर्थिक वर्ष 2022 मधील 8.7 टक्क्यांच्या तुलनेत जीडीपी वाढीचा दर मोठ्या प्रमाणात घसरेल. याआधी स्वित्झर्लंडची ब्रोकरेज कंपनी UBS India ने देखील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.9 टक्के असण्याचा अंदाज वर्तवला होता.


महागाईमुळे जीडीपीवर परिणाम


वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह जगभरातील मध्यवर्ती बँका त्यांचे व्याजदर सातत्याने वाढवत आहेत. त्याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होत आहे. यासोबतच चीनमधील कोरोना लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाच्या पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात मंदीची भीती वाढली आहे.


S&P ग्लोबल रेटिंगने अंदाज कमी केला होता


जागतिक रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सने अलीकडेच आर्थिक विकास दराचा अंदाज 7 टक्क्यांवर आणला आहे. देशांतर्गत मागणीमुळे अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा परिणाम कमी होईल असं  रेटिंग एजन्सीने असेही म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला एजन्सीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी  वाढीचा दर 7.3 टक्के आणि 2023-24 मध्ये 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता.


दुसऱ्या तिमाहीत जीडीपी


चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर 6.3 टक्क्यांवर घसरला. उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या कमकुवत कामगिरीमुळे विकास दर मंदावला आहे. जरी भारत जगातील सर्वात वेगवान विकास दर असलेली अर्थव्यवस्था आहे. 2022 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत चीनचा विकास दर 3.9 टक्के राहिला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै-सप्टेंबर तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.3 टक्के राहिला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 8.4 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2022) ते 13.5 टक्के होता.