Infosys President Ravi Kumar S : देशातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस. यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीकडून स्टॉक एक्सचेंजमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आजच राजीनामा सादर केला आहे. इन्फोसिसने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, रवी कुमार एस. यांनी कंपनीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या सखोल कौतुकाची भावना संचालक मंडळाने नोंदवली आहे.


अध्यक्ष म्हणून आपल्या भूमिकेत, रवि कुमार एस. यांनी सर्व उद्योग विभागांमध्ये इन्फोसिस ग्लोबल सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनचे नेतृत्व केले, असेही त्यामध्ये म्हटले आहे. त्यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सल्लागार, पारंपारिक तंत्रज्ञान,  इंजिनिअरिंग, डेटा आणि विश्लेषण, क्लाउड आणि इन्फ्रा सेवा चालविल्या.  


दरम्यान, 13 ऑक्टोबर रोजी नियोजित त्रैमासिक निकाल जाहीर होण्यापूर्वी इन्फोसिसचे शेअर आज बीएसईवर 2.65 टक्क्यांनी घसरून 1,423.90 रुपयांवर बंद झाले. तथापि, कंपनीने तिच्या दुसऱ्या तिमाहीतील कमाईसह शेअर बायबॅकचा विचार करणार असल्याचे सांगितल्यानंतर आज (11 ऑक्टोबर) सुरुवातीच्या व्यापारात कंपनीचा शेअर किरकोळ वाढला होता. 


दुसरीकडे कंपनीचे बोर्ड 13 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या बैठकीत कंपनीच्या पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्सच्या बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करेल, असे इन्फोसिसने 10 ऑक्टोबर रोजी सांगितले होते.