मुंबई : कर्जाच्या खाईत असलेल्या सरकारी मालकीची एअरलाईन्स कंपनी एअर इंडियाचा  (Air India) ताबा आता टाटा समूहाकडे गेला आहे. टाटा समूहाच्या वतीनं सर्वाधिक बोली लावण्यात आली आणि 68 वर्षांनंतर, जेआरडी टाटा यांनी 1932 साली स्थापन केलेल्या एअर इंडियाची मालकी परत मिळवली आहे. रतन टाटा यांनी एक जुना फोटो शेअर करत 'वेलकम बॅक एअर इंडिया' असं ट्वीट केलं आहे.


रतन टाटांनी म्हटलंय की, "जेआरडी टाटांनी स्थापन केलेली ही विमान कंपनी एकेकाळी जगातल्या प्रतिष्ठीत विमान कंपन्यांपैकी एक होती. आताही तीच प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचा टाटा समूहाचा प्रयत्न असेल."


 




कर्जाच्या खाईत बुडालेल्या एअर इंडियाच्या खाजगीकरणाची चर्चा खूप दिवसांपासून होती. आता टाटा सन्सकडे एअर इंडियाची मालकी येणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एअर इंडियावर आज घडीला तब्बल 60 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. तब्बल 127 विमाने ताब्यात असलेल्या एअर इंडियाच्या 42 आंतरराष्ट्रीय सेवा आहेत. 


टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती, हे इथे उल्लेखनीय आहे. जेआरडी टाटा म्हणजे जहांगीर रतनभॉय दादाभाई टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.  टाटा एअरलाईन्सची सुरुवात फक्त दोन लाख रुपयांच्या भांडवलावर झाली होती. टाटा एअर लाईन्सचा पहिला प्रवास हा कराची ते मुंबई असा होता. 


दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती. 1953 मध्ये याचं पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं. 


सन 2007 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यानंतर एअर इंडिया कधीच नेट प्रॉफिटमध्ये राहिली नाही. एअर इंडियाला मार्च 2021 मध्ये संपणाऱ्या तिमाहीत सुमारे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीवर 31 मार्च 2019 पर्यंत एकूण 60,074 कोटींचं कर्ज होतं. परंतु, आता टाटा सन्सला यामधील 23,286.5 कोटी रुपयांचं कर्जाचा भार उचलावा लागणार आहे. 


संबंधित बातम्या :