श्रीनगर : गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांक असलेल्या काश्मिरी पंडितांवर केल्या जाणाऱ्या  दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या खोऱ्यातील काश्मिरी पंडितांनी आपल्या कुटुंबासोबत स्थलांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे. गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी पंडिताचा आणि एका काश्मिरी शिख व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात एकूण चार अल्पसंख्यांक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 


काश्मीरमधील शेखपूरा या ठिकाणच्या काश्मिरी पंडितांच्या अनेक कुटुंबियांनी या ठिकाणाहून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. बडगाम जिल्ह्यातील या ठिकाणी 2003 मध्ये काश्मिरी पंडितांचं पुर्नवसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसातील काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या दहशतवादी हल्लांमुळे आपल्याला घराबाहेर पाऊलही ठेवायचं धाडस होत नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. 


काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय टिकू यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यातील जवळपास 5000 काश्मिरी पंडित दहशतवाद्यांच्या भीतीने पलायन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच काही इतर अल्पसंख्यांक लोकही या ठिकाणाहून पलायन करण्याला प्राधान्य देत आहेत. 


नव्वदच्या दशकात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांच्या या भागातील पुर्नवसनासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांच्यासाठी विशेष पॅकेज तयार करुन सरकारी नोकरीही देण्यात आली. पण अलिकडच्या काही घटनांवरुन असं लक्षात येतंय की पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांनी लक्ष्य केलं आहे, त्यांना ठार मारलं जात आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या ठिकाणी 25 काश्मिरी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.  


महत्वाच्या बातम्या :