अयोध्या : हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथं मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावं लागणार आहे. सर्वांना आपलं मानणारा धर्म आपल्याला उभा करायचा आहे. या मंदिराच्या पूर्ण होण्याआधी आपल्याला आपलं मनमंदिर उभं करायचं आहे, असं  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.


आज अनेक लोकं इथं येऊ इच्छित होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. आडवाणीजी देखील हा सोहळा पाहत आहेत. आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्याची सुरुवात आज झाली आहे. या आनंदाच्या क्षणी मी सर्वांचं अभिनंदन करतो, असं मोहन भागवत म्हणाले.

गेल्या 30 वर्षांच्या कठीण संघर्षाचं फळ आज मिळालं आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसं मंदिर बनेल तसं मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभं राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभं राहायला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं.  यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केलं.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राममंदिराचं भूमिपूजन

अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.

बरोबर 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते  भूमिपूजन पार पडलं.  सोशल डिस्टन्सिगचं पालन करत मुख्य पूजा त्याआधी पार पडली.  पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं वापरलं गेलं तर चांदीची वीट यावेळी ठेवण्यात आली. त्याआधी पंतप्रधानांनी पारिजातकाचं वृक्षारोपण केलं. तर हनुमानगढीत त्याआधी त्यांनी पूजा केली. पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मंत्रोच्चाराच्या गजरात पूजाविधी आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

हे ही वाचा- 


Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही


राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली? 


भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत


Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण