मुंबई : सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यातच आता केंद्र सरकारने (Central Government) गुरुवार 18 जानेवारी रोजी एक मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच जनभावनेचा आदर करत केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
सरकारने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह साजरा केला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार देशातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये 22 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांपर्यंत बंद राहतील. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर स्मारकाचे डाक तिकीट आणि देशभरात टपाल तिकीटांचे एक पुस्तक देखील जारी केले होते.
कोणत्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. त्यानुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीगड या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये.
राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानुसार अनुष्ठान देखील करण्यात येत आहे. बुधवार 17 जानेवारी रोजी कलश पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रामलल्लाच्या मूर्तीला गुरुवारी गर्भगृहात आणण्यात आले. रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात आणण्यापूर्वी विशेष पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हे अनुष्ठान 21 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. तसेच हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत समाप्त होणं अपेक्षित आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.