Ram Lalla Ayodhya: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामाचा (Shree Ram) भव्यदिव्य अभिषेक सोहळा थाटामाटात पार पडला. देश-विदेशातील दिग्गजांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि अयोध्येत रामराज्य परतलं. यावेळी प्रभू श्रीरामाच्या तेजस्वी मूर्तीची अयोध्येतील मंदिरात विधीवत स्थापना करण्यात आली. परमेश्वराचं मनमोहक रूप, आभूषणं आणि वस्त्र पाहून सारं जग थक्क झालं. डोळ्यांचं पारणं फेडणारं श्रीरामाचं रुप पाहून अख्खा देश भारावून गेला. रत्नजडीत सुवर्णालंकारांनी प्रभू श्रीरामाला सजवण्यात आलं होतं. अशातच श्रीरामाचे अलंकार कोणी घडवले, तसेच, रामच्या अंगावरील वस्त्र कोणी तयार केली? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्याच तोंडी आहेत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर...  


श्रीरामाची वस्त्र अन् सुवर्णालंकार घडवण्यासाठी घेतला धार्मिक ग्रंथांचा आधार 


अयोध्येत अभिषेक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. मंदिरात स्थापन करण्यात आलेली श्रीरामांची मूर्ती ही त्यांच्या 5 वर्षांच्या बालस्वरूपातील आहे. रामललाचे कपडे आणि दागिने त्यांच्या दैवी रूपाला अधिक तेज देत आहेत. ते बनवण्यासाठी खूप संशोधन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी अध्यात्म रामायण, वाल्मिकी रामायण, रामचरितमानस आणि आळवंदर स्तोत्रात वर्णिलेल्या भगवान रामाच्या रूपाचा अभ्यास करण्यात आला. त्यावर संशोधन करण्यात आलं. त्यानंतरच लखनौच्या हरसाहिमल श्यामलाल ज्वेलर्सनं या धार्मिक ग्रंथ आणि अयोध्येतील कवी यतींद्र मिश्रा यांच्या वर्णनाच्या आधारे दागिने तयार केले आहेत.


बनारसी कपड्यांवर सोन्याची जरी


प्रभू श्रीरामाची वस्त्र शिवताना बनारसी कपड्याचा वापर करण्यात आला आहे. श्रीरामाला पितांबर आणि अंगरखा घालण्यात आला आहे. या अंगरख्यावर सोन्याच्या जरीनं काम करण्यात आलं आहे. त्यावर शंख, पद्म, चक्र आणि मोराची नक्षई काढण्यात आली आहे. दिल्लीचे डिझायनर मनीष त्रिपाठी यांनी प्रभू रामचंद्राची वस्त्र तयार केली आहेत. 


प्रभू रामासाठी घडवण्यात आलेत रत्नजडीत सुवर्णालंकार 


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) मते, प्रभू श्रीरामाचा मुकुट सोन्याचा आहे. त्यात माणिक, पाचू आणि मोती बसवण्यात आले आहेत. त्यांच्या कानातल्यांमध्ये सोनं, हिरे, माणिक आणि पाचूही जडवले आहेत. तसेच, प्रभू श्रीरामाच्या गळ्यातही अनेक हिरे आणि दागिने घालण्यात आले आहेत. रामाचा कौस्तुभ मणी मोठ्या माणिक आणि हिऱ्यापासून बनवला आहे. तसेच पादुका बनवताना हिरे आणि पाचू वापरण्यात आले आहेत. वैजंती सोन्याची बनलेली आहे. यासोबतच रामललाचा कमरपट्टा, बाजूबंद, बांगड्या, अंगठी, पैंजण, बाण, टिळक आणि चांदीची खेळणी आणि चांदीची छत्रीही बनवण्यात आली आहे.


प्रभू रामासाठी 11 कोटींचा रत्नजडीत मुकुट


अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी 11 कोटी रुपयांचा मुकुट दान करण्यात आला. एका हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कुटुंबासह अयोध्या राम मंदिरात उपस्थित राहून मुकुट दान केला. गुजरात सूरत येथी नामांकीत हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी ग्रीन लॅब डायमंड कंपनीमध्ये प्रभू श्रीरामासाठी सोने, हिरे आणि नीलम जडीत मुकुट तयार केला. या मुकुटाचं वजन तब्बल 6 किलो आहे, तर याची किंमत 11 कोटी रुपये आहे.