Ayodhya Ram Mandir 2024 : कित्येक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलला त्यांची जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले आहेत. रामललाच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभ मुहूर्तावर झाली. मंदिरात बालरुपी श्रीराम हातात धनुष्य आणि बाण धारण करून पितांबराने सुशोभित आहेत.


राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देशाच्या विविध राज्यांतून अनेक साहित्य पाठवण्यात आले होते, यातील महाकालच्या भस्माने श्रीरामाचा (Ram) प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला.


महाकालच्या भस्माने झाली श्रीरामाची पूजा


प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. श्रीहरी विष्णूला शंख, चक्र, गदा खूप प्रिय आहे, म्हणून या सामग्रीचा वापर प्राणप्रतिष्ठेसाठी केला जातो. रामललाची प्राणप्रतिष्ठा करताना उज्जैन महाकालच्या भस्माचा विशेष वापर करण्यात आला. महाकालच्या भस्मात विशेष शक्ती असल्याचं मानलं जातं. भस्म हा भगवान शिव शंकराचा आवडता अलंकार मानला जातो. शिव हा विनाशाचा देव आहे. महाकालचा भस्म हा संदेश देतो की, हे जग संपुष्टात आल्यावर सर्व प्राणिमित्र भगवान शंकराच विलीन होतील.


बाबा महाकालची भस्म आरती जगप्रसिद्ध


महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे, येथील भस्म आरती जगभर प्रसिद्ध आहे. या मंदिरात रोज महाकालला भस्म चढवला जातो.
भस्म आरतीबाबत अनेक समज प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की, प्राचीन काळापासून महाकाल बाबांना चितेची राख अर्पण केली जात होती, परंतु आता येथे गाईच्या शेणापासून विशेष राख बनवली जाते.
पलाश, बार, शमी, पिंपळ, अमलतास, बोर या झाडांचे लाकूड आणि शेणाची गोवरी एकत्र जाळली जाते. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मंत्रांचा जप केला जातो. मग त्याचा भस्म स्वच्छ कापडातून बांधून बाबांना चढवाल जातो. असं मानलं जातं की, ज्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात महादेवाच्या चितेची सजावट केली जाते, त्याला मोक्ष प्राप्त होतो.


अशी झाली भस्म आरतीची सुरुवात


धार्मिक मान्यता आणि पौराणिक कथेनुसार, अनेक वर्षांपूर्वी उज्जैनमध्ये दुषण नावाचा एक राक्षस होता, जो तेथील प्रजा आणि राजाला छळत असे. त्याला कंटाळून लोकांनी महादेवाची पूजा केली आणि त्यांच्या रक्षणाची मागणी केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने स्वतः त्या राक्षसाचा वध केला, असं म्हणतात. यानंतर महादेवाने स्वतःला राक्षसाच्या भस्माने सजवलं आणि नंतर तो तिथेच स्थायिक झाला, तेव्हापासून या ठिकाणाला महाकालेश्वर असं नाव पडलं आणि तेव्हापासून भस्म आरती सुरू झाली.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात रामललाची बाल स्वरुपातील मूर्तीच का स्थापित केली गेली? जाणून घ्या यामागील खास कारण