Ram Mandir: अयोध्या : अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) आजपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.  सकाळी आठ ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत रामाचं (Shree Ram) दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे अयोध्येतील (Ayodhya) रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे. परंतु, काल अभिषेक सोहळा झाल्यानंतर गर्दीचं रुपांतर मंदिराच्या आवारात चेंगराचेंगरीत झाल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी लोकांनी दर्शनासाठी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच, मंदिर परिसरात असणाऱ्या प्रसारमाध्यमांना कॅमेरे बंद करण्यासही सांगण्यात आलं. 


भाविकांकडून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न 


आज, मंगळवारी राम मंदिरातील सकाळच्या परिस्थितीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. देशाच्या विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी आले आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिर आज सकाळपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी लोटली आहे, याचा प्रत्यय तुम्हाला व्हिडीओ पाहून येईलच. काही राम भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करण्यासाठी धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत अयोध्येत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाविकांना रोखणं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं दर्शनाची व्यवस्था करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.






देशभरातून भाविकांची गर्दी 


22 जानेवारीला संध्याकाळी सात वाजता राम मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतरही दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आग्रह केला. पण त्यांना नकार देण्यात आल्यानंतर काही भाविकांनी सिंहद्वारातून धावत येऊन आत शिरण्याचा प्रयत्न केला. अयोध्येतील मंदिरात एकूण 12 प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी दर्शनासाठी प्रवेश फक्त सिंहद्वारमधून उपलब्ध आहे. मंदिरात उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, अयोध्येत भाविकांची गर्दी एवढी जास्त आहे की, त्यांच्यासाठी त्या गर्दीवर नियंत्रण मिळवणं आव्हान ठरतंय. 


गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं पोलिसांसमोर आव्हान 


भाविकांच्या गर्दीतून काही लोक दर्शनासाठी मंदिराच्या आवारातही दाखल झाले. प्रभू श्रीरामाच्या नावानं घोषणाही देताना दिसले. बहुतेक लोक उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यातून येथे पोहोचल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये इतर राज्यातून येथे दर्शनासाठी आलेले काही लोकही होते. भाविकांवर बळाचा वापर करणं पोलिसांना शक्य नसल्यानं गर्दीचे व्यवस्थापन करणं कठीण झालं होतं. 


दर्शनाची वेळ संपल्याचं पोलीस वारंवार भाविकांना समजावत होते. पण भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, पोलिसांनी काहींना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाविक कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्सही लावले होते. काही ठिकाणी बॅरिकेड्स तोडल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 


दिव्यांनी सजलं मंदिर


बहुप्रतिक्षित रामललाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्यानंतर सोमवारी संध्याकाळी राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंदिरं दिव्यांनी सजवण्यात आली. फटाक्यांच्या लखलखाटानं आकाश दिवाळीसारखं उजळून निघालं. देशाच्या इतर भागातही लोकांनी फटाके फोडून हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. राम मंदिराच्या एका भिंतीवर दिवे लावून प्रभू राम आणि देवी सीता यांची चित्रं तयार करण्यात आली होती आणि मंदिराच्या मुख्य रचनेवर 'राम' हे नाव कोरण्यात आलं होतं.