नवी दिल्ली : राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांच्या निवडणुकीत नऊ जागा जिंकत भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं. यूपीमधील पोटनिवडणुकांत झालेल्या पराभवाचा वचपाच सत्ताधारी भाजपने काढला.

उत्तर प्रदेशातील दहाव्या जागेवर समाजवादी पक्षाच्या जया बच्चन विजयी झाल्या. जया बच्चन यांनी 38 मतांनी बाजी मारत सलग चौथ्यांदा राज्यसभेचं खासदारपद भूषवलं.

यूपीमध्ये भाजपचं समर्थन असलेले अपक्ष उमेदवार अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या भीमराव आंबेडकर यांचा पराभव केला.

अरुण जेटली, अनिल जैन, व्हीपीएस तोमर, अशोक बाजपेयी, एस डी राजभर, जीव्हीएल नरसिम्हा राव, कांता करदम, एच एस यादव यांनी उत्तर प्रदेशात विजय मिळवला. विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

यूपीशिवाय पश्चिम बंगालमधील 5, कर्नाटकच्या 4, तेलंगणाच्या 3, झारखंडच्या 2, तर छत्तीसगड आणि केरळमधील प्रत्येकी एका जागेचा निकाल हाती आला. कर्नाटकात काँग्रेसने 3 तर भाजपने 1 जागा मिळवली.

गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांत 33 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

या राज्यांमध्ये बिनविरोध निवडणूक

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशात तीन जागांसाठी निवडणूक होती. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ज्यामध्ये दोन टीडीपी आणि एक वायएसआरचा उमेदवार आहे.

बिहार : इथे सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. दोन जेडीयू, एक भाजप, दोन आरजेडी आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला.

छत्तीसगड : इथे एका जागेसाठी निवडणूक होती. भाजपच्या सरोज पांडे बिनविरोध निवडून आल्या.

गुजरात : गुजरातमध्ये चार जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये दोन काँग्रेसचे, तर दोन भाजपचे खासदार आहेत.

हरियाणा : इथेही भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.

हिमाचल प्रदेश : इथे एकाच जागेसाठी निवडणूक होती आणि जेपी नड्डा यांची बिनविरोध निवड झाली.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याशिवाय तीन इतर उमेदवार अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी आणि राजमणी पटेल यांची बिनविरोध निवड झाली.

राजस्थान : इथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे भूपेंद्र यादव, मदनलाल सैनी आणि डॉक्टर किरोडी लाल यांची बिनविरोध निवड झाली.

उत्तराखंड : उत्तराखंडमधील एका जागेवरही बिनविरोध निवडणूक झाली. भाजपचे अनिल बलूनी खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले.

ओदिशा : इथे तीन जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. बीजेडीचे तीन उमेदवार निवडून आले.

इतिहासात पहिल्यांदाच भाजप राज्यसभेत मोठा पक्ष

निवडणुकीआधीची स्थिती 

भाजप- 58

काँग्रेस- 54

निवडणुकीनंतरची स्थिती


भाजप - 69

काँग्रेस - 50

- 245 सदस्यांच्या राज्यसभेत 126 हा बहुमताचा आकडा आहे. या बहुमतापासून मात्र अजून बरेच दूर

- एनडीएच्या मित्रपक्षांची (टीडीपीला धरुन संख्या 17 होती) टीडीपी-6, शिवसेना-3, अकाली दल-3 पीडीपी-2 आणि काही छोटे पक्ष

- एकाचवेळी ज्या 59 जागांसाठी निवडणूक झाली त्यात भाजपने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या, काँग्रेसच्या वाट्याला 10