नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज (गुरुवारी) निवडणूक होणार आहे. एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण आणि यूपीएचे उमेदवार राज्यसभा खासदार बीके हरीप्रसाद यांच्यात ही लढत होणार आहे.


काँग्रेसचे पी. जे. कुरियन 1 जुलै रोजी निवृत्त झाल्याने राज्यसभेतील उपसभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज (गुरुवारी) निवडणूक होणार आहे. राज्यसभेचे सध्या 245 खासदार आहेत. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. यूपीए आणि एनडीए यांच्या खासदारांची आकडेवारी पाहिली तर यूपीएचे 113 आणि एनडीएचे 115 खासदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांनी हरिवंश यांच्या विजयासाठी सर्वपक्षीय नेत्यांना फोन करुन पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. नितीशकुमार यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फोन केले आहेत.

नीतीश कुमार यांच्या फोनचा परिणाम?

नितीशकुमार यांनी केलेल्या फोनचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. ओडिशातील बीजेडीने तर महाराष्ट्रातील शिवसेनेने हरिवंश नारायण यांना समर्थन जाहीर केले आहे. तर जम्मू-काश्मीरच्या पीडिपीने मतदानात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांनीसुद्धा हरिवंशयांच्या बाजूने मतदानाची आशा व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष या मतदानात भाग घेणार नसल्याचे समजते.

शरद पवारांनी का घेतली माघार?

मंगळवारपर्यंत उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचं नाव चर्चेत होतं. मात्र शरद पवारांनी बीजेडीचे नवीन पटनायक यांना फोन केला, तेव्हा नवीनबाबूंनी नितीशकुमारांनी आधीच समर्थन मागितल्याने, आपण त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं. नवीन पटनायकांची ही भूमिका काँग्रेसला कळवून पवारांनी ते साथ देत नसतील तर आपला उमेदवार देण्यात रस नाही अशी भूमिका घेतली.

काय आहे गणित?

राज्यसभेचे सध्या 245 खासदार आहेत. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. दोन्ही बाजूंचे पक्के मित्रपक्ष पकडले तर यूपीए 113 आणि एनडीए 115 इतकी काट्याची टक्कर आहे. 9 खासदार असलेल्या बीजेडीचं मतदान ज्याच्या पारड्यात, तो विजेता अशी स्थिती होती. पण ओडिशात भाजप हा बीजेडीचा प्रमुख शत्रु असतानाही, उमेदवार नितीशकुमारांचा आहे असं सांगत बीजेडी एनडीएच्या गोटात शिरली आहे.

2019 च्या आघाड्यांचं प्रतिबिंब

राज्यसभेच्या या निवडणुकीत पुढच्या लोकसभा निवडणुकीत आघाड्यांची जोडतोड कशी होऊ शकते याचं छोटं प्रतिबिंब पाहायला मिळालं. टीआरएस, एआयडीएमके, बीजेडी हे सगळे पक्ष भाजपप्रणित एनडीएच्या बाजूला उभे राहिले. तर शिवसेनाही निमूटपणे एनडीएलाच मतदान करणार आहे. त्यामुळे राज्यसभेत अगदी हातातोंडाशी आलेला विजय विरोधकांच्या हातातून निसटला आहे. सर्वाधिक 73 (नामनिर्देशित 8 पकडून) खासदार भाजपकडे असले तरी पूर्ण बहुमत नसल्याने भाजपने स्वत:चा उमेदवार दिला नाही. मित्रपक्षांना संधी दिल्याशिवाय भाजपलाही एनडीए मजबूत करता आली नसती.

संबंधित बातम्या
राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी एकजुटीची हवा निघाली?

राज्यसभा : यूपीएमध्ये एकजूटता नाही, राष्ट्रवादीचा लढण्यास नकार?