चेन्नई : डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झालीय ती डीएमकेची धुरा कुणाच्या खांद्यावर दिली जाणार? खरंतर करुणानिधी यांनी आपल्या हयातीतच एम के स्टॅलिन यांच्याकडे एकप्रकारे पक्षाची जबाबदारी सोपवली होती. मात्र तरीही आता डीएमकेचा सर्वेसर्वा होण्याचा मान कुणाला मिळणार, हा प्रश्न उरतोच.
करुणानिधी जवळपास पाच दशकं डीएमकेचे प्रमुख होते. त्यांच्या निधनानंतर अर्थात डीएमकेच्या आगामी प्रमुखाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झालीय. एम के अलागिरी आणि एम के स्टॅलिन या करुणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. अलागिरी हे माजी मंत्री असून, त्यांना 2014 साली पक्षातून काढण्यात आले होते. त्यामुळे नेतृत्त्वाचा आगामी संघर्ष सुद्धा दोघांमध्ये असेल का? असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय.
काही वर्षांपूर्वी डीएमकेच्या आगामी नेतृत्त्वाबद्दल चर्चा झाली आहे. त्यावेळी एकदा अलागिरींनी म्हटले होते की, "डीएमके मठ आहे का, जेणेकरुन तिथे महंत आपला वारसदार निवडेल."
अर्थात, त्यावेळी अलागिरींनी दस्तुरखुद्द करुणानिधी यांच्यावरच निशाणा साधला होता. मात्र त्यानंतर अलागिरी यांना पक्षातून काढण्यात आले आणि ते राजकारणापासून काहीसे दूरच राहिले. मात्र, करुणानिधी जेव्हा चेन्नईतील कावेरी हॉस्पिटलमध्ये भरती होते, त्यावेळी अलागिरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत कावेरी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.
“डीएमकेमध्ये राजकीय वारसदारासाठी संघर्ष होण्याची कोणतीच शक्यता नाही. कारण करुणानिधी हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत करुणानिधी यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र होतं. या दरम्यान कुटुंबातील प्रत्येकजण एकमेकांशी सुसंवाद साधत होते.”, असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर डीएमकेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
मात्र, राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार श्याम षणमुगम हे डीएमकेच्या नेत्यांशी सहमत नाहीत. त्यांच्या मते, “डीएमकेच्या नेतृत्त्वासाठी आता संघर्ष सुरु होईल. भावांमधील लढाई संपणार नाही. स्टॅलिन यांनाच सर्वसमावेशक राजकारण करावं लागेल. अन्यथा, प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्याचा भाजपचा अजेंडा असून, डीएमकेला कमकुवत करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. कारण आता करुणानिधीही हयात नाहीत.”
दरम्यान, डीएमके तामिळनाडूच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे. अनेक वर्षे या पक्षाने राज्याची सत्ताही उपभोगली आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे डीएमकेच्या प्रमुखाला राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अर्थात डीएमकेच्या प्रमुखपदावरुन संघर्ष झाल्यास आश्चर्य वाटायला नको. डीएमकेची सूत्र पूर्णपणे कुणाच्या हातात जातील, हे आगामी काळात कळेलच.
संबंधित बातम्या :
करुणानिधी अनंतात विलीन, मरिना बीचवर अंत्यसंस्कार
...म्हणून करुणानिधी कायम काळा चष्मा लावायचे!
करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा वाद हायकोर्टात, मरिना बीचचं महत्त्व काय?
करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार!
सिनेमा ते सीएम... करुणानिधी यांचा राजकीय प्रवास
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
करुणानिधी यांच्या निधनानंतर DMK ची धुरा कुणाच्या खांद्यावर?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2018 11:05 PM (IST)
करुणानिधी जवळपास पाच दशकं डीएमकेचे प्रमुख होते. त्यांच्या निधनानंतर अर्थात डीएमकेच्या आगामी प्रमुखाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -