Rajiv Gandhi : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची 20 ऑगस्ट रोजी जयंती आहे. राजीव गांधी हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेणाऱ्या राजीव गांधींना राजकारण कधीच रूची नव्हती. पण राजकीय अनुभव नसतानाही राजीव यांना त्यांच्या कामामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. 20 ऑगस्ट 1944 रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला. त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या आवडत्या पायलटची नोकरी सोडावी लागली आणि त्यांना राजकारणात यावे लागले. राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असे.

  


राजीव शालेय जीवनात कोणाशी जास्त बोलत नसत. त्यांचे प्रारंभिक शिक्षण दिल्ली डेहराडून येथे झाले. लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. त्यांनी केंब्रिजमध्ये तीन वर्षे शिक्षण घेतले पण त्यांचा अभ्यास पूर्ण होऊ शकला नाही. 1966 मध्ये त्यांनी इम्पीरियल कॉलेज लंडन येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा कोर्स सुरू केला. परंतु त्यांना येथेही पदवी मिळू शकली नाही आणि ते भारतात परतले.  


1966 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा राजीव गांधी भारतात परतले. पण त्यांनी राजकारणात कधीच रस दाखवला नाही. राजीव गांधी यांनी 1968 मध्ये सोनिया गांधी यांच्याशी विवाह केला. दोन वर्षांनी राहुल गांधी आणि त्यानंतर दोन वर्षांनी प्रियांका गांधी यांचा जन्म झाला. 


1980 मध्ये राजीव गांधी यांचे बंधू संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. भाऊ संजय यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्या आयुष्यात एक मोठे वळण आले आणि त्यांना राजकारणात यावे लागले. जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा अनेक लोक त्यांना अननुभवी आणि नवशिक्या म्हणत. राजीव यांना लहानपणापासून पायलट बनण्याची आवड होती, पण राजकारणात आल्यानंतर त्यांना त्यांचा छंद आणि नोकरी दोन्ही सोडून द्यावे लागले. 


फार कमी लोकांना माहिती आहे की, राजीव गांधींना फोटोग्राफीची आवड होती. त्यांची फोटोग्राफीबद्दलची समज खूप खोल होती. अनेक प्रसंगी असे चित्रही समोर आले होते की, पंतप्रधान असूनही ते अनेकवेळा स्वतःची गाडी चालवत असत. राजीव गांधी हे एकमेव पंतप्रधान आहेत जे स्वतः कार चालवायचे.


एवढेच नाही तर पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी देशहितासाठी अनेक धाडसी पावले उचलली. भारताने आजवर पाहिलेल्या सर्व मोठ्या यशाचे श्रेय राजीव गांधींना जाते. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाची बीजे पेरली तसेच तळागाळातील नेत्यांना सक्षम करण्यासाठी पंचायती राज संस्थांना बळकट केले.


राजीव गांधी यांनी भारतातील आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे नेतृत्व खरे दूरदर्शी म्हणून केले. राजीव गांधी यांनी देशभरात उच्च शिक्षण कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचाही पुढाकार घेतला. 


राजीव गांधी यांनी राष्ट्र उभारणीत तरुणांच्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे केले. राजीव गांधींच्या नेतृत्वात भारताने वेगवान तांत्रिक प्रगती, सामाजिक-आर्थिक सुधारणा, संसाधनावर आधारित कृषी विकास पाहिला ज्यामुळे भारत एक उदयोन्मुख शक्ती बनला.