Bilquis Bano Case: बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. गुजरातमधील बिल्कीस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींना माफ करण्यासाठी त्यांनी भाजपला दुय्यम मानसिकतेचा पक्ष म्हटले.


काय म्हणाले राहुल गांधी 


या प्रकरणावरून ट्वीट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, ''उन्नाव - भाजप आमदाराला वाचवण्याचे काम, कठुआ - बलात्कार्‍यांच्या समर्थनार्थ रॅली, हाथरस - सरकार बलात्काऱ्यांच्या बाजूने, गुजरात - बलात्कार्‍यांची सुटका आणि सन्मान. गुन्हेगारांना पाठिशी घालणे हे भाजपची महिलांप्रती असलेली दुय्यम मानसिकता दर्शवते. अशा राजकारणावर लाज वाटत नाही, पंतप्रधान?''


बोलण्यात आणि वागण्यात अंतर आहे: राहुल गांधी 


याआधीही राहुल गांधींनी याच मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केलं होत. पाच महिन्यांच्या गरोदर महिलेवर बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या 3 वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा दरम्यान सोडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. स्त्रीशक्तीच्या गप्पा मारणाऱ्या देशातील महिलांना काय संदेश देत आहेत? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे.






काय आहे प्रकरण? 


गोध्रा ट्रेन आगीच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात मार्च 2002 मध्ये गर्भवती बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला होता. तर कुटुंबातील इतर सहा सदस्य कसेतरी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्यांचे प्राण वाचले. हे दोषी 2002 मध्ये बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. ज्यांची आता सुटका करण्यात आली आहे.


दोषींची सुटका केल्यानंतर बिल्कीस बानोने यावर आपली प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, तिच्या आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची मुदतपूर्व सुटका केल्याने न्यायव्यवस्थेवरून तिचा विश्वास उडाला आहे. सरकारचा हा निर्णय ऐकून आपण अर्धांगवायू झाल्याचे तिने सांगितले. ती म्हणाले की, माझ्याकडे शब्द नाहीत. मला अजूनही शुद्ध आलेली नाही. आज मी फक्त एवढेच म्हणू शकते की एखाद्या स्त्रीला असा न्याय कसा मिळेल?