Rajasthan Assembly Election 2023: यावर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका (Rajasthan Assembly Election) होणार आहेत. लवकरच राजस्थानच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. अशातच सर्वच पक्षांनी राजस्थानवर (Rajasthan News) आपलं लक्ष केंद्रीय केलं असून राजस्थान जिंकण्यासाठी कंबरही कसल्याचं पाहायला मिळत आहे. अजून निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण त्यापूर्वीच सर्वच पक्षांकडून या ना त्या मार्गांनी प्रचार केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 


राजस्थानमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका जवळ आल्यानं सर्वच पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आहे. भाजप आगामी निवडणुकीत आपली गमावलेली सत्ता परत मिळवण्याच्या प्रयत्नात असताना काँग्रेस सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, रंगीबेरंगी पगडी घातलेल्या पंतप्रधानांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.


दरवर्षीप्रमाणे, स्वातंत्र्य दिनानिमित्त (15 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलं आणि सलग दहाव्यांदा देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींच्या पगडीनं अनेकांचं लक्ष वेधलं. पंतप्रधानांनी राजस्थानी बांधणीचा पिवळा आणि लाल फेटा घातला होता. मोदींनी ध्वजारोहणाच्या वेळी घातलेल्या या राजस्थानी पगडीला आता राजकीय रंग दिला जात आहे. ही पगडी राजस्थानातील मारवाडी लोकांच्या पारंपरिक वेशभूषेतील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.  


राजस्थानी पगडी आणि राजकीय रंग


पंतप्रधान मोदी राजस्थानी बांधणी प्रिंटसह पिवळा आणि लाल पचरंगी साफा किंवा पगडी परिधान केलेले दिसले. पंतप्रधान मोदींनी राजस्थानी पगडी परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान प्रत्येक वेळी पगडी परिधान करतात. 2014 मध्ये देखील 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी मारवाडी साफा परिधान करुन ध्वजारोहण केलं होतं. राजस्थानात पगडी घालण्याचा एक वेगळा ट्रेंड आहे, मग वृद्ध असो वा तरुण, सर्वच रंगीबेरंगी पगडी घालतात. इथे पगडीचे अनेक प्रकार आहेत, पण मारवाडी साफाचा इतिहास अत्यंत जुना आहे.


राजस्थान विधानसभा निवडणूक


लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दृष्टीनं राजस्थान विधानसभा निवडणुका भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोघांसाठीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, कॉंग्रेस 100 जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, बहुमतापेक्षा एक जागा कमी होती. भाजपला 73 जागा मिळाल्या, त्या सरकार स्थापनेसाठी खूपच कमी होत्या. त्यानंतर राजस्थानमध्ये काँग्रेसनं बहुजन समाज पक्षासोबत एकत्र येत सरकार स्थापन केलं.


राजस्थानमधील विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी बसपाला 6 जागा मिळाल्या. राजस्थानमध्ये गेल्या दोन दशकांपासून प्रत्येक वेळी सत्ताबदलाची प्रथा आहे. अशातच आता देशातील दोन मोठे पक्ष भाजप आणि काँग्रेस आपापल्या बाजूनं लोकांना जोडण्यात मग्न आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


"गावात 2 कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचं माझं स्वप्न"; PM मोदींची लाल किल्ल्यावरुन ड्रोन योजनेची घोषणा