Independence Day 2023 : भारत : देशात आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वाजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी देशातील जनतेला संबोधित देखील केले आहे. तर विरोधकांकडूनही स्वातंत्र्यदिनाच्या (Independance Day) शुभेच्छा देण्यात आल्या आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांसारख्या विरोधातील अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतमाता प्रत्येक भारतीयाचा आवाज : राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देशवासीयांना दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, भारतमाता ही प्रत्येक भारतीयाचा आवाज आहे. देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेचा व्हिडीओ देखील त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या या व्हिडीओमध्ये त्यांना भारत जोडो यात्रेदरम्यान आलेले अनुभव देखील सांगितले आहे. तसेच, भारताच्या विविधतेचं कौतुक देखील त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केलं आहे.
सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांना विनम्र अभिवादन : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्वीट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशभक्तांना विनम्र अभिवादन केलं आहे. तसेच, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा निश्चय करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. सर्व भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
हे स्वातंत्र्य मौल्यवान आहे : आदित्य ठाकरे
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अगणित बलिदानांतून, प्रचंड त्यागातून आणि जनतेच्या जबरदस्त इच्छाशक्तीतून मिळालेलं हे स्वातंत्र्य मौल्यवान असल्याचं म्हणत ते जपण्याचं आवाहन देखील या निमित्ताने केलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, भारताला हुकूमशाहीच्या राजवटीपासून वाचवूया, लोकशाही टिकवण्यासाठी निकराने लढा देऊया.
नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांनी देखील दिल्या शुभेच्छा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, 'तिरंगा फडकवताना आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करुया. ज्या मूल्यांसाठी त्यांनी लढा दिला ती मूल्य जपण्याचा आपण प्रयत्न करुया. उज्वल, उत्तम भारतासाठी एकजूटीने उभं राहूया. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.' तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.