मुंबई : रेल्वेमध्ये सुरक्षाविषयक सुमारे एक लाख रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. सातत्याने होणारे अपघात आणि सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालय खडबडून जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेत इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी भरती झालेली नाही. सध्या रेल्वेत सुरक्षाविषयक एकूण सव्वालाख पदं रिक्त आहेत. ही भरती प्रक्रिया सातत्याने चालणारी असली, तरी त्यातील एक लाख पदं तातडीने भरण्यात येतील.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी भरतीप्रक्रिया वेगवान करण्याची सूचना दिली आहे. त्यासाठी एका वर्षाची कालमर्यादा ठरवण्यात आली आहे.

सुरुवातीला, यंदाच्या वर्षी 25 हजार पदं भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अपघातांवरील टीकेनंतर आणि गोयल यांच्या हाती रेल्वे मंत्रालयाची सूत्रं सोपवल्यानंतर भरती संख्या एक लाखापर्यंत नेण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.

या पदांना अगोदरच मान्यता असल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळाची पुन्हा मंजुरी अपेक्षित नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
रेल्वे मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीने मध्यंतरी सादर केलेल्या अहवालात सुरक्षाविषयक सव्वालाख पदं रिक्त असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि केंद्राचे कानही उपटले होते.

काय आहे अहवाल?

1 एप्रिल 2016 नुसार, रेल्वेमध्ये एकूण दोन लाख 17 हजार 369 जागा रिक्त आहेत.
सुरक्षेविषयक रिक्तपदांची संख्या एक लाख 22 हजार 763 इतकी आहे.
त्यापैकी 47 हजार पदं विविध विभागातील अभियंत्यांची आणि तब्बल 41 हजार पदं गँगमनची आहेत.

रेल्वेच्या अवाढव्य सुरक्षेची जबाबदारी वाहून नेण्यासाठी सुमारे साडेसात लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; पण सध्या फक्त सहा लाख 23 हजार कर्मचारीच हा गाडा ओढत आहेत. कामाचा अधिक बोजा, पुरेशी विश्रांती आणि वेळेवर रजा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर ताण आहे. त्यातून सुमारे 75 टक्के अपघातांना मानवी म्हणजे कर्मचाऱ्यांच्या चुका कारणीभूत असल्याची आकडेवारी आहे.