नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद झालेल्या बहुतांश रेल्वे आता सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या काळाता खबरदारी घेत लोक पुन्हा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे गाड्यांचा वापर करत आहेत. दरम्यान अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यात असे म्हटलं आहे की प्रवासी गाड्यांसाठी रेल्वेकडून जास्तीचे पैसे वसूल केले जात आहेत. यावर रेल्वेने गुरुवारी स्पष्टीकरण दिलं आहे.


रेल्वेने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, प्रवाशांकडून रेल्वे अतिरिक्त भाडे आकारत आहे, याबाबत काही माध्यमांमधील वृत्त दिशाभूल करणारे आणि निराधार आहे. त्यात अजिबात तथ्य नाही. गर्दी कमी करण्यासाठी नेहमीच्या प्रथेप्रमाणे उत्सव/सुट्टी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. उत्सव सुरूच आहेत आणि आजही कापणीचा सण साजरा केला जात आहे. यावर्षी ज्या मार्गावर अनेक उत्सव विशेष गाड्या चालू आहेत तिथे मागणी वाढली आहे. गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. 2015 पासून अशा गाड्यांचे भाडे थोडे जास्त ठेवण्यात आले आहे. यावर्षी काही नवीन केलेले नाही. ही एक प्रस्थापित प्रथा आहे.





प्रवासी वाहतुकीला नेहमीच रेल्वेकडून अनुदान दिले जाते. प्रवासी वाहतुकीत रेल्वे नुकसान सोसत आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत रेल्वे कोविड काळात गाड्या चालवत आहे. बऱ्याच मार्गावर कमी प्रवासी संख्येने लोकांच्या सेवेत रेल्वेगाड्या सुरु आहेत. चालवल्या जात असलेल्या सर्व गाड्यांमध्ये इतर श्रेणी व्यतिरिक्त मोठ्या संख्येने 2 एस श्रेणीचे डबे आहेत ज्यांचे भाडे आरक्षित प्रवर्गामध्ये सर्वात कमी आहे. 40 टक्के प्रवाशांनी कोविडपूर्व अनारक्षित प्रवासाच्या परिस्थितीपेक्षा 2 एस श्रेणीत अधिक चांगला प्रवासाचा अनुभव घेतला आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.


रेल्वेने कोणते अहवाल नाकारले?


सामान्य वर्गात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे आरक्षणाशिवाय तिकीट मिळणार नाही, अशी बातमी होती. कितीही लहान टप्प्याचा प्रवास असो, आरक्षणाशिवाय करता येणार नाही. त्याशिवाय ट्रेन येण्याच्या अर्धा तास आधी तिकीट खिडकी उघडेल आणि येथेही प्रवाशांना आरक्षणाचे तिकीट मिळेल, असे अहवाल आले होते.


कोरोनावर नियंत्रम मिळवण्याच्या उद्देशाने रेल्वेकडून 22 मार्चपासून टप्प्याटप्प्याने गाड्या चालवल्या जात आहेत. कोरोनाच्या काळातही रेल्वेने काम सुरू केले आणि सुमारे 60 टक्के क्षमतेसह प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवले आहे. सध्या एकूण 1058 मेल / एक्स्प्रेस, 4807 उपनगरी सेवा आणि 188 प्रवासी गाड्या नियमितपणे धावत आहेत.