नवी दिल्ली : 9 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान बूक करण्यात आलेल्या रेल्वे तिकिटांवर 5 हजार रुपयांपेक्षा अधिक रिफंड मिळणार नाही, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वे काऊंटरवर तिकीट बूक केलेल्यांसाठी हा नियम असणार आहे.


पाचशे, हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर रेल्वे तिकिटांसाठी जुन्या नोटा सध्या चालत आहेत. त्यामुळे अनेकांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी महागडे रेल्वे तिकीट बूक करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला झाला. या दिवशी रेल्वेचे 2 हजार तिकीट बूक करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबरला तब्बल 27 हजार जणांनी एसी फर्स्ट क्लास श्रेणीचे तिकीट बूक केले. एकाच दिवसात रेल्वेची तिकीट कमाई 4 कोटींवरुन 13 कोटी रुपये झाली.

तिकिटाची वाढती बुकिंग पाहता दहा हजारांपेक्षा जास्त शुल्क असणाऱ्या तिकीटाचं रिफंड कॅश न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल, असा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र आता ही मर्यादा 5 हजार करण्यात आली आहे.

दरम्यान 50 हजारांपेक्षा जास्त किमतीचं तिकीट बूक करण्यासाठी रेल्वेने पॅन क्रमांक याआधीच अनिवार्य केला आहे.