नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात निवडणुकीत होणारा खर्च आणि एकत्रित निवडणुका या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.


एनडीएसोबत असणारी शिवसेना नोटाबंदीच्या निर्णयावरुन विरोधकांच्या कळपात सहभागी झाली. त्याच पार्श्वभूमीवर उद्या ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात विरोधक राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

मात्र राष्ट्रपतींना लगेच भेटायला जायची गरज नसल्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. कदाचित ममतांच्या नेतृत्वात जाणं काँग्रेसला टाळायचं असल्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पण सरकारविरोधी आवाज मात्र वाढत चालला आहे.

सेनेची मोदींना दिल्लीत घेरण्याची तयारी

मोदींना शरद पवार चालतात, तर आम्हाला ममता का नाही? असा सवाल करणाऱ्या शिवसेनेने आता मोदींना दिल्लीत घेरण्याची तयारी सुरु केल्याचं चित्र आहे. सेना खासदारांची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोनवरुन ममता बॅनर्जी यांच्याशी दीर्घ चर्चा केली.

त्यामुळे उद्याच्या तृणमूलच्या मोर्चामध्ये शिवसेनेचे खासदारही सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना वगळता एनडीएच्या सगळ्या घटकपक्षांनी मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक केलं आहे.