Rahul Gandhi In Parliament : तब्बल 134 दिवसानंतर अखेर काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांनी लोकसभेत (Loksabha) कमबॅक केलं आहे. सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर अखेर राहुल गांधीचं पाऊल पुन्हा संसदेत पडलं. इतक्या दिवसानंतर जेव्हा ते संसदेत आले तेव्हा त्यांचं जल्लोषात स्वागत देखील करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी हजेरी लावली होतीच पण त्यांच्यासोबत इतर विरोधी पक्षांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे महम्मंद फजल, डीएमकेचे तिरुची शिवा असे इंडिया आघाडीतले इतर खासदार स्वागतासाठी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालायने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालय किती वेगानं त्यांना खासदारकी बहाल करतं याची सर्वांना उत्सुकता लागली होती. लोकसभा सचिवालयानं सोमवार (7 ऑगस्ट) रोजी सभागृहाचं कामकाज सुरु होण्याआधीच नोटिफिकेशन काढत राहुल गांधींचं सदस्यत्व पुन्हा बहाल केलं. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्याच दिवशी रात्री निकालाची प्रत काँग्रेसनं सचिवालयाला पोहचवली होती. दुसऱ्या दिवशीच म्हणजे शनिवारी अगदी पोस्टानं काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना निवेदन सादर केलं होतं.
अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत राहुल गांधी होणार सहभागी
मंगळवार (8 ऑगस्ट) रोजी लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यावर सभागृहाच चर्चा देखील होणार आहे. मोदी सरकारच्या विरोधात 2014 नंतरचा हा दुसरा अविश्वास प्रस्ताव असणार आहे. मागच्यावेळी राहुल गांधींच्या भाषणानं आणि त्यानंतरच्या मिठीनं हा अविश्वासाचा प्रस्ताव गाजला होता. त्यामुळे आता या प्रस्तावाच्या चर्चेवेळी राहुल गांधी काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यावेळी हा अविश्वासाचा प्रस्ताव काँग्रेसनंच आणला आहे. त्यामुळे या चर्चेची सुरुवात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडूनच होणार आहे.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कुठल्याही कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली की आमदार, खासदारांचं सदस्यत्व धोक्यात येतं. पण अनेकदा तो कालावधी लोकसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्षांच्या विवेकावर ठरतो. राहुल गांधींच्या बाबतीत 23 मार्चला निकाल आल्यानंतर अगदी 26 तासांत अपात्रतेची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांना त्यांचं शासकीय निवासस्थान देखील सोडावं लागलं होतं.
या शिक्षेला स्थगिती मिळाली नसती तर राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबद्दलही साशंकता होती. पण आता ते संकट टळलं आहे. राहुल गांधी यांची खासदारकी जाण्याआधी त्यांनी शेवटचं भाषण हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी अदानी आणि मोदींचा फोटो दाखवून खळबळ उडवली होती. त्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत राहुल गांधी काय करतात याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.