Rahul Gandhi In Parliament : लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) आज सोमवारी (7 ऑगस्टला) संसदेत पोहोचले. राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच INDIA च्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचाही समावेश होता. संसद परिसरात पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.


त्याआधी राहुल गांधी यांनीही आपला ट्विटर बायो बदलला. यामध्ये त्यांनी खासदार असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लोकसभा सचिवालयाकडून आज अधिसूचना जारी करुन राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आलं.






काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवले


दरम्यान राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लाडू खाऊ घातला. यानंतर खरगे यांनी बाकीच्या नेत्यांना लाडू भरवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांना सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. भारतातील लोकांसाठी आणि विशेषत: वायनाडच्या लोकांसाठी हा दिलासा आहे. भाजप आणि मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात जो काही वेळ शिल्लक आहे त्याचा वापर करुन विरोधी नेत्यांना लक्ष्य करुन लोकशाहीला बदनाम करण्याऐवजी खऱ्या कारभारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे."


तर सचिन पायलट म्हणाले की, सत्याचा विजय झाला. जनतेचा आवाज पुन्हा संसदेत बुलंद होईल. राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्याने लोकशाही वाचवण्यासाठी आणि सार्वजनिक समस्या मांडण्याच्या लढ्याला नवं बळ मिळेल. उज्ज्वल भविष्याचा पाया रचून भारताला सक्षम बनवण्याच्या दिशेने सर्वजण एकत्रितपणे पुढे जातील.






प्रचारसभेत मोदी आडनावावरुन राहुल गांधीचं वक्तव्य आणि मानहानीचा खटला


13 एप्रिल 2019 रोजीकर्नाटकातील कोलार इथल्या निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?" या वक्तव्याच्या विरोधात भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर कलम 499, 500 अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. 2019 च्या निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी सर्व चोरांचं आडनाव मोदी हे का आहे, असं म्हणत संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता.


चार महिन्यांनी पुन्हा सदस्यत्व बहाल 


राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाने चार वर्षानंतर 23 मार्च 2023 रोजी त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केलं. लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की एखाद्या प्रकरणात खासदार आणि आमदाराला 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) तातडीने रद्द केलं जातं. एवढंच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते सहा वर्षे निवडणूक लढण्यासही अपात्र ठरतात. सूरत सत्र न्यायालय, अहमदाबाद हायकोर्ट या गुजरातच्या कोर्टांनी राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवलेली होती. पण अखेर जवळपास चार महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने शिक्षेला स्थगिती देत राहुल गांधींना दिलासा दिला. त्यानंतर आज लोकसभेचं सदसत्व बहाल केल्यानंतर त्यांनी संसदेत हजेरी लावली.


हेही वाचा