Rahul Gandhi Vacates Bungalow : लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (22 एप्रिल) अधिकृत निवासस्थान रिकामे केले. मानहानी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. राहुल गांधींनी त्यांचे सर्व सामान त्यांच्या शासकीय निवासस्थानातून नेले. माजी काँग्रेस अध्यक्ष दिल्लीतील 12 तुघलक लेन येथील बंगल्यात राहत होते. त्यांची बहीण आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी बंगला लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केला. सरकारी निवासस्थान रिकामे केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, हे घर मला देशातील जनतेने 19 वर्षे दिले. मला त्याचे आभार मानायचे आहेत. मी ते रिकामे करत आहे. सत्य बोलण्याची मी किंमत चुकवत आहे, ती मी देत ​​राहीन. कुणीतरी खरं बोलायला हवं, ते मी करत आहे.


काँग्रेसची ट्विटरवर मोहीम 


दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी राहुल यांना सोशल मीडियात "मेरा घर आपका घर" म्हणत पाठिंबा दिला. काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, हा देश राहुल गांधींचे घर आहे. लोकांच्या हृदयात राहणारे राहुल, ज्यांचे जनतेशी नाते अतूट आहे. कुणाला त्यांच्यात त्यांचा मुलगा दिसतो, कुणाला भाऊ, कुणाला त्यांचा नेता, राहुल सर्वांचे आहेत आणि सर्वजण राहुलचे आहेत. यामुळेच आज देश म्हणतो आहे, राहुलजी, माझं घर, तुमचे घर. प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या की, राहुल गांधी सरकारबद्दल खरे बोलले त्यामुळेच त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे, पण ते खूप धैर्यवान आहेत, अजिबात घाबरत नाहीत, घाबरणार नाहीत आणि त्यांचा संघर्ष सुरूच ठेवतील.


काँग्रेस नेत्यांकडून कौतुक


राहुल गांधींचे कौतुक करताना खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले की, लोकसभा सचिवालयाच्या आदेशानुसार राहुल गांधी यांनी आज तुघलक लेनमधील त्यांचे घर रिकामे केले. कोर्टाने त्यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आणि हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट त्यांना पुन्हा ठेवू शकले असते, पण त्यांनी घर रिकामे करण्याचा त्यांचा निर्णय आदर दाखवून देतो. 


अपात्र ठरल्यानंतर बंगला रिकामा करावा लागला


मोदी आडनावाशी संबंधित एका प्रकरणात राहुल यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर त्यांना 22 एप्रिलपर्यंत सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. राहुल गांधींनी 14 एप्रिल रोजी बंगल्यातून त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान हलवले होते. हा बंगला त्यांना खासदार म्हणून देण्यात आला होता.


दोन दशके या बंगल्यात 


आज त्यांच्या सामानासह एक ट्रक इमारतीतून बाहेर पडताना दिसला. जवळपास दोन दशकांपासून ते या बंगल्यात राहत होते. त्यांचे कार्यालय बदलल्यानंतर, त्यांनी आधीच त्यांची आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या 10, जनपथ या निवासस्थानी राहण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी पहिल्यांदा 2004 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले आणि 2019 मध्ये त्यांनी वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. 


तुम्ही नेहमी आमच्या घरात आणि हृदयात


काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राहुल यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यावरून भाजपवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, ते तुम्हाला घरातून बाहेर काढू शकतात, परंतु तुमचे स्थान नेहमीच आमच्या घरात आणि हृदयात असेल. आम्हाला माहीत आहे की असे एपिसोड तुम्हाला तुमचा आवाज उठवण्यापासून आणि सत्य बोलण्यापासून थांबवणार नाहीत. आज संपूर्ण देश एका स्वरात म्हणत आहे, माझे घर तुमचे घर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या