Satya Pal Malik : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या समर्थकांसह शनिवारी (22 एप्रिल) दुपारी आर. के. पुरम पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावरून रंगली. यानंतर दिल्ली पोलिसांनी सत्यपाल मलिकांवरून सुरु झालेल्या चर्चेवर ट्वीट करत माहिती दिली. दिल्ली पोलिसांच्या साऊथ वेस्टचे डीसीपी यांनी सांगितले की, सत्यपाल मलिक यांना ना ताब्यात घेतले आहे, ना अटक करण्यात आली आहे. ते स्वत: पोलीस ठाण्यात आले आहेत. आर. के. पुरम सेक्टर-9 मधील एका उद्यानात हे जमले होते. जेथे निदर्शनास परवानगी नाही. त्या लोकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
दरम्यान, आज ABP LIVE शी खास संवाद साधताना माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, आज पश्चिम यूपी, हरियाणा, राजस्थानमधील अनेक खाप चौधरींचे 300 प्रतिनिधी त्यांना भेटणार असून त्यांच्यासोबत भोजनही करणार आहेत. यादरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आर.के. पुरम येथील त्यांच्या घराजवळील उद्यानात खाप पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. जिथे सर्वजण जेवणासाठी जमले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मलिक यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की, त्याच दरम्यान पोलिसांचे पथक तेथे आले आणि त्यांनी तंबू हटवला.
पोलीस ठाण्यातच जेवण
मलिक यांचे निकटवर्तीय के. एस. राणा यांनी सांगितले की, सत्यपाल मलिक यांना जेवणापासून रोखल्याचा राग आला आणि त्यांनी स्वत: पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही आर. के. पुरम पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यामुळे पोलिस ठाण्यात सर्वांना जेवण देण्यात आले. मलिक यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, मलिक स्वतः पोलिस ठाण्यात आले आहेत आणि आम्ही त्यांना ते स्वतःच्या इच्छेने जाऊ शकतात, असे सागंतिले आहे.
सीबीआयने बजावलेल्या समन्सची चर्चा
यापूर्वी सत्यपाल मलिक यांना सीबीआयचे समन्स मिळाल्याचे वृत्त आले होते. यानंतर काँग्रेस आणि आप नेत्यांनी केंद्र सरकारला घेरले. मात्र या प्रकरणी सत्यपाल मलिक यांनी खुद्द सीबीआयने आपल्याला समन्स पाठवले नसून स्पष्टीकरण मागितल्याचा खुलासा केला. मलिक म्हणाले की, 'मला सीबीआयकडून कोणतेही समन्स मिळालेले नाहीत. ही केवळ अफवा आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (सीबीआय) कार्यालयातही जावे लागणार नाही. उलट सीबीआयचे अधिकारी स्वत: त्यांना भेटायला घरी येणार आहेत.
सत्यपाल मलिक का चर्चेत?
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना जम्मू-काश्मीरमधील इन्शुरन्स स्कॅमबाबत प्रश्नावली पाठवून त्याची उत्तरे द्यावीत, असं सांगणारी नोटीस सीबीआयने बजावली आहे. सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुलवामा हल्ल्यावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा हल्ला झाला होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विदेशी टीव्ही चॅनेलच्या शूटिंगसाठी जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये होते. सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मोदी सरकावर देशभरातील विरोधी पक्षांनी चौफेर हल्ला चढवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या