नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशाला 'आंदोलनजीवी' हा नवा शब्द मिळाल्याचं सांगत शेतकरी आंदोलकांवर टीका केली होती. आता त्यांच्याच या शब्दाचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर 'क्रॉनीजीवी' असल्यांची टीका केली आहे.


केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने 2021 सालासाठी 1.75 लाख कोटी इतकं निर्गुंतवणुकीचं लक्ष ठेवलं आहे. त्यासाठी अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील आपली गुंतवणूक कमी करुन खासगी क्षेत्राला गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. या आधीही केंद्र सरकारने अनेक सार्वजनिक क्षेत्रातील आपली गुंतवणूक काढून घेत निर्गुतंवणुकीच्या धोरणाला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे.


सरकारच्या या धोरणावर आता राहुल गांधी यांनी टीका केली आहे. त्यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. आपल्या या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, "क्रॉनीजीवी आहेत ते, जे देशाला विकत आहेत." राहुल गांधींनी या ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारचे आणि उद्योगपतींचे लागेबांध असल्याची टीका केली आहे. तसेच केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आपली गुंतवणूक कमी करुन त्या कंपन्या खासगी उद्योगपतींच्या घशात घालत आहे असाही आरोप केलाय.





शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी काही उद्योगपती देव; राहुल गांधींचा हल्लाबोल


या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली असून मोदी सरकार हे सामान्यांसाठी काम करत नसून त्यांच्या काही उद्योगपती मित्रांच्या भल्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सामान्यांसाठीचा नसून केवळ एक टक्के उद्योगपतींच्या भल्याचा असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


या आधी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, "अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे. जवान आणि शेतकरी नाहीत तर मोदी सरकारसाठी केवळ तीन-चार उद्योगपती देव आहेत."


पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं असा आरोप केला होता.


मोदी सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं; राहुल गांधींचा हल्लाबोल