नवी दिल्ली: सन 2015 पासून ते 2019 पर्यंत जवळपास 6.76 लाख भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला असून ते आता इतर देशात कायमचे स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली.
सन 2015 आणि 2016 साली 1.45 लाख नागरिक, सन 2017 साली 1.28 लाख नागरिक, सन 2018 साली 1.25 लाख नागरिक तर सन 2019 साली 1.36 लाख भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला अशी माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलं की एक कोटी 24 लाख 99 हजार 395 भारतीय नागरिक सध्या जगभरात वास्तव करत आहेत. यांच्यापैकी 37 लाख नागरिक हे OCI कार्डधारक आहेत.
या नागरिकांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे आपले भारतीय नागरिकत्व सोडले हे स्पष्ट करण्यात आलं नाही. तरीही रोजगारानिमित्त या लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय.
NRI | अनिवासी भारतीयांना मिळणार मतदानाचा अधिकार, निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारकडं प्रस्ताव
भारतात एक लाख श्रीलंकन शरणार्थी
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितलं की भारतातील तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांत 93,032 श्रीलंकन नागरिक शरणार्थी म्हणून राहत आहेत. त्यामध्ये 58,843 श्रीलंकन नागरिक हे तामिळनाडूमधील विविध शिबिरात राहत आहेत तर 34,135 नागरिक हे विविध भागात राहत आहेत. या लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे असेही गृह राज्यमंत्री म्हणाले.
संयुक्त राष्ट्राने गेल्या महिन्यात प्रकाशित केलेल्या आपल्या 'इंटरनॅशनल मायग्रेशन 2020 हायलाइट्स' या अहवालात असं म्हटलं होतं की भारतातील 1.8 कोटी लोकसंख्या ही जगभर वास्तवास आहे. यामध्ये सर्वाधिक भारतीय लोकसंख्या ही युएईमध्ये (UAE) वास्तव करते असेही या अहवालाच्या हायलाइट्मध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 3.6 लोकसंख्या ही स्थलांतरीत असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय.