काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली.
राहुल गांधींच्या राज्याभिषेक सोहळ्याला मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कारकीर्द
राहुल गांधी यांची 11 डिसेंबर रोजी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. देशातील सर्वात जुन्या पक्षाचा नवा अध्यक्ष म्हणून राहुल गांधींवर पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली.
काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी 11 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली होती. तसंच राहुल गांधी बिनविरोध निवडल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं होतं.
काँग्रेस मुख्यालयात राज्याभिषेक
दिल्लीतील 24 अकबर रोडवरील AICC म्हणजेच काँग्रेस मुख्यालयात आज राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला . यासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत जमा झाले. विविध राज्यातील आलेल्या कार्यकर्त्यांनी त्या त्या राज्याची लोककला सादर करुन, एक भारत, श्रेष्ठ भारतचं दर्शन घडवलं.
देशभरात काँग्रेसच्या कार्यालयातही राहुल गांधी अध्यक्ष झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
राहुल गांधींसमोरील आव्हान
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाकडून सर्वाधिक अपेक्षा तरुण कार्यकर्त्यांना आहे. मात्र त्याच वेळी राहुल गांधी यांच्या जबाबदारीचं कक्ष फार मोठं आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत.
- कमकुवत होत असलेल्या काँग्रेसला एक संघटना म्हणून पुन्हा उभं करण्याची सर्वात मोठी जबाबदारी राहुल गांधींच्या खांद्यांवर आहे.
- काँग्रेस सध्या आपल्या वाईट काळातून जात आहे. सध्या सहा राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे.
-पुढील वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यामध्ये पक्षाला विजय मिळवण्यांचं मोठं आव्हान राहुल गांधींसमोर आहे.
- याचवेळी राहुल गांधींना 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवरही नजर ठेवावी लागणार आहे. यासाठी त्यांना इतर पक्षांसोबत युती करण्याची शक्यता पडताळावी लागेल.
अध्यक्ष बनताच गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येणार आहेत. मतदानानंतरच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची परिस्थिती फार चांगली दिसत नाही. जर एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले, तर पक्षाच्या जल्लोषावर विरजण पडू शकतं.
काँग्रसचे 18वे, गांधी घराण्यातील सहावे
राहुल गांधी हे काँग्रेसचे 18वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत.
याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते 2017
18) राहुल गांधी - 2017 पासून
संबंधित बातम्या
अखेर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड!
माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत
'अंतरात्मा की आवाज' ते 'देश की बहू', सोनिया गांधींच्या 20 गोष्टी
गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्ष काँग्रेसवर नेहरु-गांधी घराण्याचं राज्य
‘घराणेशाही हीच काँग्रेसची परंपरा’, विरोधकांची जोरदार टीका
राहुल गांधींवरुन पूनावाला बंधूंमध्ये वाद, तहसीन यांनी नातं तोडलं