नवी दिल्ली: देशात दररोज कोरोनाच्या चार लाखांहून जास्त रुग्णांची भर पडत असताना आता यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर विजय मिळवल्याचं आधीच श्रेय घेत आहेत असं सांगत ते म्हणाले की, भारतातील कोरोना परिस्थितीवरून संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना मोदी सरकार मात्र आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या कामात व्यस्त आहे. 


काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे. कोणीही आता आपल्या मदतीला येणार नाही, पंतप्रधान सुद्धा नाहीत. देशातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि केंद्र सरकार आता त्याची जबाबदारी राज्यांवर ढकलत आहे. वैज्ञानिकांनी वारंवार सूचना देऊनही सुरुवातील कोरोनाचा धोका ओळखायला मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे."


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, "भारत हा जगातील पहिलाच देश आहे की ज्या देशात विशेषज्ञ आणि तज्ज्ञांच्या मदतीशिवाय, त्यांच्या सल्ल्याशिवाय कोरोना विरोधात लढा लढला जातोय. लोकांचा जीव वाचवण्यासाठी, योग्य नियोजनासाठी आणि सकारात्मक निर्णयासाठी या तज्ज्ञांची मते आणि सूचना या अत्यंत महत्वाच्या असताना भारतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय."


देशातील कोरोनाची स्थिती बिघडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांतील प्रचारात व्यस्त राहिले असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. या प्रचाराच्या दरम्यान पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री कुठेही मास्कचा वापर करताना दिसले नाहीत अशीही टीका त्यांनी केली. 


देशातील कोरोनाच्या संकटाचा सामना करायचा असेल तर केंद्र सरकारने सर्व पक्षांचे मत विचारात घेऊन धोरण तयार केलं पाहिजे अशी सूचना शनिवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे. या कामात केंद्र सरकारला काँग्रेसचा पाठींबा असेल असंही त्या म्हणाल्या. 


महत्वाच्या बातम्या :