नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असताना दुसरीकडे कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात कोरोनाच्या लसीचा तुटवडा होणं ही गंभीर समस्या असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की, "देशात कोरोनाचे संकट असताना लसीचा तुटवडा हा काही उत्सव नसून ती गंभीर समस्या आहे. आपल्या देशवासियांचे प्राण संकटात टाकून कोरोना लस निर्यात करणे योग्य आहे का? केंद्र सरकारने सर्वच राज्यांना कोणताही भेदभाव न करता मदत केली पाहिजे. आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन या महामारीवर मात करावं लागेल. "


 




महाराष्ट्राने या आधीच आपल्याला गरजेपेक्षा कमी डोस मिळत असल्याची तक्रार केंद्राकडे केली असून लोकसंख्या आणि रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात कोरोनाच्या लसींचा डोस मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच इतर अनेक राज्यांनीही त्यांना कोरोनाच्या लसीचे कमी डोस मिळतात अशी तक्रार केली आहे. 


माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही केंद्र सरकार कोरोना लसीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याला दुजाभावाची वागणूक देतेय असा आरोप केला आहे. कोरोना लसीच्या बाबतीत देशभरात जो काही गोंधळ सुरू आहे तो केंद्रानेच घातला आहे असंही ते म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या :