Coronavirus Crisis : देशभरात कोरोनाचा कहर जसजसा अधिकाधिक फैलावू लागला आहे, तसतशी प्रशासनाकडून देण्यात येणारी नियमावली आणि निर्देश अधिकाधिक कठोर होऊ लागले आहेत. भारतामध्ये कोरोना संकटानं गंभीर वळण घेतलेलं असतानाच अनेक शहरं, जिल्हे आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील 24 तासांच देशात अनेक ठिकाणी कोरोना नियम आणखी कठोर झाल्याचं पाहायला मिळालं.
गाजियाबाद, बरेली, मेरठ, नोएडामध्ये कर्फ्यू
उत्तर प्रदेशात कोरोनाचा वाढता धोका पाहता गाजियाबाद, बरेली, मेरठ, नोएडा या भागात जिल्हा प्रशासनानं कर्फ्यूचे निर्देश दिले आहेत. बरेलीमध्ये 20 एप्रिलपर्यंत रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्देश लागू असतील. गाजियाबादमध्ये 17 एप्रिलपर्यंत रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू सुरु असेल. तर मेरठमध्येही 18 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू असेल. या ठिकाणांपूर्वी प्रयागराज, लखनौ, वाराणासी या भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
मध्य प्रदेशातील 5 जिल्ह्यांमध्ये 9 दिवसांचा कडक लॉकडाऊन
कोविड 19 चा संसर्ग धास्तावणाऱ्या वेगानं वाढत असल्यामुळं मध्य प्रदेशातील 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 7-9 दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भोपाळमधील कोलार क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून 9 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त रतलाम, बैतूल, कटनी, खरगोन आणि छिंदवाडा या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले आहेत.
जम्मू काश्मीरमधील 8 जिल्ह्यांतील शहरी भागांमध्ये कर्फ्यू
जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरसह आठ जिल्ह्यांतील शहरी भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्याचे निर्देश दिले. हा नाईट कर्फ्यू शुक्रवारपासून सुरु होणार असून, रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल. जम्मू, उधमपुर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बड़गाम, अनंतनाग आणि कुपवाड़ा, या भागांत हे निर्बंध लागू असतील.
राजस्थान आणि गुजरातमध्येही कर्फ्यू
राजस्थानमधील जयपुर, अजमेर, भीलवाड़ा, जोधपुर, कोटा, उदयपुर, सागवाड़ा, कुशलगढ या भागांमध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असेल. तर, गुजरातमधील 20 शहरांमध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. यामध्ये सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर, भावनगर, जूनागढ़, गांधीनगर, आनंद, नडियाद, मेहसाणा, मोरबी, दाहोद, पाटन, गोधरा, भुज, गांधीधाम, भरूच, सुरेंद्रनगर आणिअमरेलीचा समावेश आहे.
महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही दिवसांपूर्वी राज्या शासनाने नाईट कर्फ्यूचे निर्देश दिले. शिवाय शनिवार आणि रविवार हे दोन दिवस लॉकडाऊनचेही निर्देश राज्यात लागू आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्बंध आणखी कठोर होताना दिसत आहेत.
छत्तीसगढमधील रायपूर, दुर्ग हे भाग पूर्णपणे लॉकडाऊनच्या निर्बंधांचं पालन करत आहेत. तर, तामिळनाडूमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू असेल.