नवी दिल्ली : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून आता राजकारण तापलं आहे. केंद्र सरकार कोरोना लस पुरवठ्यावरून महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरशासमोर उभं रहावं आणि स्वत: ला प्रश्न विचारावा की केंद्राने महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला आहे का? असंही ते म्हणाले आहेत. 


माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "काही जठील तथ्यांच्या आधारे केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या प्रसारावरून लक्ष्य करतंय. महाराष्ट्राने आतापर्यंत आपल्या 80 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केलं आहे. यामध्ये जवळपास 20 राज्ये ही महाराष्ट्राच्या मागे आहेत. महाराष्ट्राने आतापर्यंत 73 टक्के फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली आहे. यामध्ये केवळ पाच राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे."


पी चिदंबरम म्हणाले की, "ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. या सर्व गोष्टी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतात. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरशासमोर उभं रहावं आणि स्वत:ला प्रश्न विचारावा की केंद्राने महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला आहे का?"


देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात जो काही गोंधळ निर्माण झालाय तो केंद्रानेच घातल्याचा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिंदंबरम यांनी केलाय. केंद्राने घातलेल्या या गोंधळामुळेच राज्यांना आपश्यक त्या प्रमाणात कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.


 




 देशात सर्वाधिक कोरोना संसर्ग आठ राज्यांमध्ये वाढत आहे. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि केरळचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात गुजरातचा समावेश नाही. देशातल्या 56 टक्के केसेस एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्या महाराष्ट्राला केवळ 82 लाख डोस देण्यात आले आहेत. तर तीन टक्‍क्‍यांपेक्षा कमी केसेस असलेल्या गुजरातला आतापर्यंत 77 लाख डोस देण्यात आले आहे. यावरुन महाराष्ट्रासोबत केंद्र सापत्न वागत असल्याचे स्पष्ट होत आहे.


महाराष्ट्रात 14 लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे 14 लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान 40 लाख लस पुरवठा केला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केलीय. 


महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या लस वाया घालवल्या, त्याचं नियोजन व्यवस्थित केलं नाही अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी केली होती. आता त्याला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा असल्याचं राजेश टोपे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या :