नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याच्या मागणीला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जोर देण्यात आला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या बैठकीत राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीश रावतसह अनेक नेत्यांनी प्रस्तावाला समर्थन दिलं. महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी नकारही दिलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष होतील याबाबत अटकळ बांधली जात आहे.


दुसरीकडे काँग्रेसने सीडब्ल्यूसीच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल यांना अध्यक्ष बनवण्याच्या मागणीशी संबंधित प्रश्नावर काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी रणदीप सुरेजवाला म्हणाले की, "ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण बैठकीत यावर चर्चा झाली नाही. राहुल गांधी योग्य वेळी निर्णय घेतील."


राहुल आणि सोनिया गांधींकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
काँग्रेस कार्यकारिणीच्या व्हर्च्युअल बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीला बहुतांश नेत्यांनी समर्थन दिलं. परंतु सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण जाणकारांच्या मते, या मागणीनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्याची शक्यता वाढली आहे.


2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा
2017 वर्षाच्या अखेरीस काँग्रेस अध्यक्ष बनलेल्या राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तातडीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दो महिने त्यांची मनधरणी करण्यात आली. परंतु यात यश न आल्याने ऑगस्टमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधी यांची पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मात्र तेव्हापासून अनेक वेळा पक्षातून राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवावं अशी मागणी होत आहे.


देशाची भावना लक्षात घेऊन राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष बनावं
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रस्ताव ठेवताना राहुल गांधी यांनी देशाची भावना लक्षात घेऊन काँग्रेसची धुरा सांभाळायला हवी. या बैठकीत अशोक गहलोत यांच्याशिवाय राजस्थान सीडब्ल्यूसी सदस्य रघुवीर मीणाही उपस्थित होते.