नवी दिल्ली : भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. राजधानी दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज (24 जून) सलग अठराव्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर कालएवढेच आहेत मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात प्रति लिटर 10.48 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलही 8.50 रुपयांनी महागलं आहे.


18 दिवसात डिझेल 10.48 रुपयांनी महागलं
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 18 दिवसांपैकी बरेच दिवस दिवस क्रूड ऑईलचे दर सामान्यच राहिले. पण भारतीय बाजारात याचे दर सतत वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत त्या हिशेबाने कमी झालेल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात 10.48 रुपये प्रति लीटरने वाढ झाली हे. या अठरा दिवसात पेट्रोलचे दरही 8.50 रुपये प्रति लिटर वधारले आहेत.


पेट्रोलच्या तुलनेत डिझेल असं वधारलं!
दिल्लीमध्ये इंधनावर लागणारा कर एप्रिल महिन्यापर्यंत देशात सर्वात कमी होता तर मुंबईत सर्वाधिक होता. दिल्ली सरकारने 4 मे रोजी डिझेलवरील व्हॅट 16.75 टक्क्यांनी वाढवून 30 केल्यानंतर दिल्लीमध्ये डिझेलची किंमत मुंबईपेक्षाही वाढली आहे. पेट्रोलवरचा व्हॅटही वाढवला, आधी 27 टक्के असलेला व्हॅट आता 30 टक्के करण्यात आला. यामुळे पेट्रोलच्या दरात 1.67 रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलचे दर 7.10 रुपयांनी वधारले.


दिल्ली वगळता इतर राज्यांमध्ये डिझेल स्वस्त
डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत अंतर असण्याचं कारण म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर कमी कर आकारतं. पण ऑक्टोबर 2014 मध्ये इंधन दरावरील सरकारचं नियंत्रण हटल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर फारच कमी होत गेलं. आता दिल्लीत तर अशी परिस्थिती आहे की, डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे. मात्र महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. खरंतर दिल्लीमध्ये पेट्रोलवर 64 टक्के कर आकारला जातो आणि डिझेलवर 63 टक्के कर आहे. कर समान असल्याने त्यांच्या दरातील अंतर जवळपास संपलं आहे.