नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्मचे 100 दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारने 100 पूर्ण केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणतेही विकास कामे न करता 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल मोदी सरकारला शुभेच्छा, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "100 दिवस कोणतीही विकासकामं न करता (100DaysNoVikas), सतत लोकशाहीवर हल्ला करण्यासाठी, टीकाकार मीडियाचा गळा घोटण्यासाठी मोदी सरकारला शुभेच्छा. स्पष्ट नेतृत्त्वाची कमी, आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेत सुधार आणण्यासाठी सरकारकडे योग्य दिशा आणि उपाययोजनांची कमी आहे."





काँग्रेसनेही मोदी सरकारने 100 दिवस पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियावरुन सरकारवर हल्लाबोल केला. सरकारवर टीका करताना काँग्रेसने हुकूमशाही, अनागोंदी आणि अराजकता या तीन शब्दांचा वापर केला आहे.


आठ क्षेत्रांमध्ये दोन टक्क्यांपेक्षा कमी विकासदराची नोंद झाली आहे. मात्र एकीकडे आमचे अर्थमंत्री अद्यापही ही गोष्ट मान्य करण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे आमची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. समस्या सोडवायच्या असतील, तर त्या आधी शोधणे गरजेचं असतं, मात्र सरकार यामध्ये अपयशी झालं आहे.