विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी त्याबाबत घोषणा केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी खासदार ओवैसी सांगत नाहीत तोपर्यंत आमची युती कायम असल्याचं म्हटलं आहे. "आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसं हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि आता ओवेसी यांच्याकडे निरोप घेऊन गेली आहेत", असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यातील आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील संघर्ष परत एकदा समोर आला आहे.
'वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचं इम्तियाज जलील यांनी यापूर्वीच सांगितलं आहे.
विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं परिपत्रक यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांनी जारी केलं आहे. 'वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती', असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार