Rahul Gandhi Passport : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना एका स्थानिक न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी मिळाली आणि दोन दिवसांनी म्हणजेच रविवारी (28 मे) रोजी त्यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. त्यानंतर राहुल गांधी हे आज अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. सुरत न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांच्या राजनैतिक प्रवासाचे दस्ताऐवज परत करावे लागले होते. सामान्य पासपोर्ट (Passport) मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी दिल्लीच्या न्यायालयात दहा वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) म्हणजेच एनओसी मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने राहुल गांधींना तीन वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट कार्यालयाने त्यांना रविवारी पासपोर्ट देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर रविवारी दुपारी राहुल गांधी यांना त्यांचा पासपोर्ट सुपूर्त करण्यात आला आहे. दिल्लीतील न्यायालयाने राहुल गांधी यांना दहा वर्षांऐवजी तीन वर्षांसाठी सामान्य पासपोर्ट जारी करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश गेल्या शुक्रवारी दिले होते.
राहुल गांधी यांनी दहा वर्षांसाठी हे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांना फक्त एका वर्षासाठी परवानगी देण्यात यावी असं सांगत या मागणीला विरोध केला होता. तसेच 'राहुल गांधी यांच्याकडे दहा वर्षांसाठी एनओसी मागण्यासाठी कोणतेही ठोस आणि वैध कारण नाही' असा युक्तिवाद सुब्रमण्यम यांच्याकडून न्यायलयात करण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु या कोर्टात 24 मे रोजी यावर सुनावणी करण्यात आली. तेव्हा सुब्रमण्यम यांनी 'राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यामुळे तपासणीत अडथळा निर्माण होऊ शकतो' असा युक्तिवाद केला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय देण्यासाठी एक दिवसाचा अवधी मागितला. 26 मे रोजी राहुल गांधी यांना तीन वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता राहुल गांधी यांना तीन वर्षांनी पुन्हा एकदा पासपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे.
सॅन फ्रान्सिस्कोसाठी राहुल गांधी रवाना होणार
राहुल गांधी आज (29 मे) रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी रवाना होतील. त्यानंतर ते अमेरिकेच्या काही इतर शहरांमध्ये देखील त्यांचे कार्यक्रम पार पाडतील. तसेच चार जून रोजी ते अमेरिकेतील भारतीय लोकांशी देखील संवाद साधतील.