Delhi News: नव्या संसद भवनाच्या (Parliament Building Inauguration News) उद्घाटनापूर्वीपासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं पाहायला मिळालं आहे. रविवारी सकाळपासूनच दिल्लीत राजकीय नाट्य सुरू आहे. सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कुरघोडी अजूनही थांबलेल्या नाहीत. अशातच सध्या कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांचं ट्वीट चर्चेचा विषय ठरतंय. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी भाजपला सल्ला देताना सेंगोलचा (Sengol) खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही समजताय तसा सेंगोलचा अर्थ नाहीये, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी ट्वीट करुन भाजप नेत्यांना सांगितलं आहे. तसेच, खरं तर तुम्हाला सेंगोलचा खरा अर्थ जाणूनच घ्यायचा नाहीये, असंही कपिल सब्बल म्हणाले. तुम्ही सांगत असलेला सेंगोलचा अर्थ आम्ही स्विकारू शकत नाही, असंही ते म्हणाले. 


कपिल सिब्बल ट्वीट करून काय म्हणाले?


माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं की, भारतीय जनता पक्षाचे नेते सेंगोलला ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचा समानार्थी शब्द मानतात. मात्र, तसं नाही. शक्य असल्यास तुम्ही माझं म्हणणं ऐका, असे त्यांनी म्हटलं आहे. भारतात सत्तेचं हस्तांतरण त्या लोकांच्या इच्छेनं झालं ज्यांनी स्वतःला हे संविधान दिलं. देवी मीनाक्षी यांनी मदुराईच्या राजाला भेट दिलेलं सेंगोल हे राज्य करण्याच्या दैवी अधिकाराचं प्रतीक होतं.






3 दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी केलेलं आवाहन


तीन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्वीटमध्ये संसद हे आपल्या प्रजासत्ताकाचे प्रतीक असल्याचं लिहिलं होतं. राष्ट्रपती हे प्रजासत्ताकाचे प्रमुख असतात. या औपचारिक कार्यक्रमात राष्ट्रपतींची अनुपस्थिती म्हणजे, आपल्या प्रजासत्ताकाच्या लोकाचाराचा अपमान करण्यासारखं आहे, असं कपिल सिब्बल म्हणाले. तसेच, त्यांनी केंद्र सरकारला याची काळजी आहे का? असा प्रश्नही विचारला आहे. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी तीन दिवसांपूर्वीच यावर प्रश्न उपस्थित केला होता. आज त्यांनी सेंगोलचा अर्थ सांगून भाजपला सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या सेंगोलचा अर्थ आम्ही स्वीकारू शकत नाही, असं यावेळी सिब्बल यांनी भाजपला सूचित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (28 मे 2023) सकाळी संसदेची नवी इमारत देशाला समर्पित केली. मात्र, यावरुन अजुनही राजकारण सुरूच आहे.


नव्या संसद भवनाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन 


देशाला 28 मे रोजी नवीन संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द करण्यात आला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. जुन्या संसदेत लोकसभेत 543 खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत 888 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची 250 ची क्षमता वाढवून 384 करण्यात आली आहे.