नवी दिल्ली : राफेल विमानांच्या खरेदीवरुन भारतात मोदी सरकारवर काँग्रेसनं खूप आरोप केले..पण देशात या करारावरुन कुठल्याही चौकशीचं पाऊल पडलं नाही. पण आता या राफेलबाबत फ्रान्समध्ये मात्र मोठी घडामोड घडलीय. या करारातल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तिथे न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आलीय.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत गाजलेला राफेलचा मुद्दा नंतर भारतात गायब झाला. पण फ्रान्समध्ये मात्र राफेलची फाईल पुन्हा ओपन झालीय. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी फ्रान्समध्ये एका न्यायमूर्तींची नियुक्ती झालीय. मीडियापार्ट या न्यूज वेबसाईटनं यासंदर्भातली माहिती दिलीय. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन या दोघांचीही यात चौकशी होऊ शकते. कारण 2016 साली जेव्हा हा करार झाला तेव्हा मॅक्रॉन हे फ्रान्सचे अर्थमंत्री होते. यावरुन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींचं नाव न घेता निशाणा साधला आहे. 


Rafale Deal:राफेलबाबत फ्रान्समध्ये महत्वाची घडामोड, चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती, फ्रान्सच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांचीही चौकशी होण्याची शक्यता


राहुल गांधीचं ट्वीट, म्हणाले 'चोर की दाढी'
राफेलबाबत फ्रान्समधून अपडेट आल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींचं नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे.  राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये #RafaleScam असा उल्लेख करत “चोर की दाढ़ी.” असं लिहिलं आहे. याआधी काँग्रेसनं या व्यवहाराची संयुक्त संसदीय कमिटीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.  


राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा 
राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तशी भारतातही या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


राफेलचं भूत पुन्हा बाटलीबाहेर येणार?
2016 मध्ये राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन आणि भारत सरकारमध्ये करार झाला
36 विमानं 59 हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याचा हा करारा होता
काँग्रेसच्या काळात या कराराचा प्रस्ताव आला तेव्हा 126 विमानांसाठीचा होता
पण मोदी सरकारनं केलेल्या करारात विमानांची संख्याही कमी आणि किंमत मात्र जास्त ठेवली गेल्याचा आरोप
यात 21 हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा काँग्रेसचा आरोप
दोन महिन्यांपूर्वीच फ्रान्सच्या मीडियापार्ट वेबसाईटनं या करारासाठी दसॉल्टनं 8.5 कोटी रुपये गिफ्ट म्हणून दिल्याचा गौप्यस्फोट केला होता


राफेल हा मुद्दा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रस्थानी होता.  याच मुद्द्यावरुन राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' चा नारा दिला..पण तरीही मोदींच्याच चेहऱ्यावर जनमताची मोहोर उमटली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानंही या प्रकरणी चौकशीस नकार दिला..अर्थात काँग्रेस कोर्टात गेली नव्हती, त्यांचं म्हणणं होतं की न्याय कोर्टातून मिळणार नाही, तर संयुक्त संसदीय समिती नेमूनच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. 


14 जूनला म्हणजे मागच्या पंधरा दिवसांपूर्वीच आता फ्रान्समध्ये या नव्या हालचाली राफेलबाबत घडल्यात..त्यामुळे आता तिथल्या चौकशीचा अहवाल काय येतो हे पाहणं महत्वाचं असेल. जे काही फ्रान्समध्ये घडेल त्याचे पडसाद भारतात उमटणार हे नक्की.