Rahul Gandhi In Farm : कधी दिल्लीतील करोलबागमध्ये बाईकची सर्विसिंग करणारे तर कधी कॉलेजच्या कट्ट्यावर रमणारे, कारचं स्टेअरिंग सोडून कधी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हाती घेणारे तर कधी ट्रक ड्रायव्हरसोबत गप्पांमध्ये रंगणारे, कधी टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेणारे तर कधी मशरुम बिर्याणीचा स्वाद चाखणारे, कधी लहानग्यांच्या पंगतीला जेवायला बसणाऱ्या राहुल गांधींना (Rahul Gandhi) आपण पाहिलं आहे. तेच राहुल गांधी आज शेतात भाताची लागवड करताना दिसले. हरियाणातील सोनीपतमधल्या मदिना गावात राहुल गांधी शेतात राबताना दिसले.
हरियाणातील सोनीपत इथे शनिवारी (8 जुलै) सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक थांबले. इथे त्यांनी शेतकर्यांसह शेतात भाताची लागवड केली. तसंच ट्रॅक्टर चालवून शेतात नांगरणी देखील केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांशी शेतीबाबत चर्चाही केली. शिवाय राहुल यांनी शेतकऱ्यांसोबत बसून नाश्ताही केला.
राहुल गांधींनी मोर्चा थेट शेतात वळवला
राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला जात होते. जीटी रोडवरील कुंडली सीमेवर पोहोचल्यावर त्यांनी शेतात जाण्याचं ठरवलं आणि थेट सोनीपतच्या ग्रामीण भागात गेले. राहुल गांधी हे राष्ट्रीय महामार्ग 48 वरुन कुरड रोड बायपास मार्गे गोहानाकडे रवाना झाले. यानंतर त्यांनी आपल्या मार्गावरुन मोर्चा दुसरीकडे वळवला आणि सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या बरोदा विधानसभा मतदारसंघातील मदिना गावात पोहोचले. सकाळी 6.40 च्या सुमारास ते भैंसवन-मदिना रस्त्यावरील संजय यांच्या शेतात दाखल झाले. मदिना गावात सुमारे दोन तास शेतात राबल्यानंतर राहुल गांधी सकाळी 8.40 वाजता परतीच्या वाटेला निघाले. परतत असताना त्यांनी गोहाना पीडब्ल्यूडी विश्रामगृह इथे कपडे बदलून सोनीपतला रवाना झाले.
राहुल गांधी यांच्या शेतातील भेटीबाबत सर्वच अनभिज्ञ
राहुल गांधी हे सोनीपतमधील शेतात थांबणार असल्याची माहिती कोणालाच नव्हती. ते शेतात आल्याची माहिती मिळताच बरोद्यातील काँग्रेसचे आमदार इंदुराज नरवाल आणि गोहानाचे आमदार जगबीर मलिकही तिथे पोहोचले. नरवाल म्हणाले की, राहुल गांधींच्या आगमनाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, मात्र गावकऱ्यांकडून याची माहिती मिळताच आपण त्यांना भेटायला गेलो. गोहानाचे काँग्रेस आमदार जगबीर मलिक म्हणाले की, राहुल गांधी इथे आले हे आमचं आणि सोनीपतचं भाग्य आहे. गावातील शेतीची पद्धत काय आहे याची त्यांची पाहणी केली, शेतकरी धानाची लागवड कशी करतो? यामध्ये त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती त्यांनी घेतली.
संजय यांच्या शेतात राहुल गांधींकडून भाताची लावणी
राहुल गांधी सकाळीच मदिना गावातील शेतकरी संजय यांच्या शेतात पोहोचले. राहुल आले तेव्हा शेतकरी आणि मजूर एकत्र भात पिकाची लावणी करत होते. खरंतर सुरक्षरक्षकांसह कोणीतरी शेतात येत असल्याचं शेतकऱ्यांना दिसलं, परंतु सुरुवातील ती व्यक्ती कोण हे ओळखू शकले नाहीत. मात्र राहुल गांधी जवळ येताच शेतकऱ्यांनी त्यांना ओळखलं.
सोनीपतचा बरोदा हा काँग्रेसचा बालेकिल्ला
दरम्यान मदिना या गावाचा सोनीपतच्या बरोदा ग्रामीण मतदारसंघात समावेश होतो. काँग्रेसचे इंदुराज नरवाल उर्फ भालू हे सध्या बरोदा मतदारसंघाचे आमदार आहेत. पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे योगेश्वर दत्त यांचा पराभव केला होता. संपूर्ण बरोदा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचा मतदारसंघ रोहतकला लागून आहे.
हेही वाचा
Rahul Gandhi In karolbagh : राहुल गांधींकडून बाईकची सर्व्हिस...राहुल गांधींचा अनोखा अंदाज!