Belgaon Crime : कर्नाटकातील बेळगाव (Belgaon) जिल्ह्यात जैन मुनीची (Jain Seer) हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चिकोडी तालुक्यातील हिरेकूडी येथील आश्रमाचे बेपत्ता झालेले जैन मुनी आचार्य श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांची हत्या (Murder) झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी जैन मुनींच्या हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी जैन मुनींची आश्रमात हत्या करुन मृतदेहाची बाहेर विल्हेवाट लावल्याचे कबूल केले आहे. रायबाग तालुक्यातील खटकभावी गावच्या बाहेर शेतातील विहिरीत जैन मुनींचा मृतदेह टाकण्यात आला असून पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत.


पैसे परत देण्याची मागणी केल्याने जैन मुनींची हत्या


बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील हे स्वतः शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत. मृतदेहाचा शोध सुरु असलेल्या भागात बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. माध्यम प्रतिनिधींना देखील तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आला असून त्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जैन मुनींनी एका व्यक्तीला पैसे दिले होते. ते पैसे परत देण्याची मागणी केल्याने जैन मुनींची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जैन मुनींची हत्या झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांनी एकच आक्रोश केला.


5 जुलैपासून जैन मुनी बेपत्ता


मुनी आचार्य श्री 108 कामकुमार नंदी महाराज हे बुधवारपासून (5 जुलै) बेपत्ता होते. भक्तांनी कामकुमार नंदी महाराज यांना 5 जुलै रोजी संध्याकाळी शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. भाविकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. मग गुरुवारीच (6 जुलै) भाविकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी परिसरातील ही घटना आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु करुन एका संशयिताची चौकशी केली. त्याने जैन साधूची हत्या करुन मृतदेह फेकल्याची कबुली दिली. या प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.


हेही वाचा


कर्नाटकातील राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकाच पुतळ्याचं दोन वेळा अनावरण, काय आहे वाद?