Brain-Eating Amoeba: कोरोनाचा धोका देशभरातून निघून गेला अन् नवीन संसर्गाने आता एन्ट्री घेतली आहे. केरळमध्ये 'ब्रेन इटिंग अमिबा'च्या संसर्गानं (Brain-Eating Amoeba) धाकधूक वाढवली आहे. केरळच्या (Kerala) अलाप्पुझा जिल्ह्यात एका 15 वर्षीय मुलाचा मेंदूच्या या दुर्मीळ संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला शुक्रवारी दिली.


केरळमध्ये आतापर्यंत पाच जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. केरळच्या अलाप्पुझा येथील थिरुमाला वॉर्डमध्ये 2016 मध्ये या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळ्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 2019 आणि 2020 मध्ये मलप्पुरममध्ये दोघांना या संसर्गाची लागण झाली होती, तर 2020 आणि 2022 मध्ये  कोझिकोड आणि थ्रिसूरमधील एकाला देखील या संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा या संसर्गाने डोकं वर काढलं असून यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे


रोगाचा संसर्ग झालेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. अलप्पुझा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना दूषित पाण्यात अंघोळ करणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.


रोगाचा संसर्ग कसा होतो?


ब्रेन इटिंग अमिबा हा रोग दूषीत पाण्यात राहणाऱ्या जिवंत अमिबामुळे होतो. जेव्हा आपण दूषीत पाण्यात पोहतो, डुबकी मारतो किंवा अंघोळ करतो त्यावेळी हा जैविक अमिबा आपल्या शरीरात प्रवेश करतो. हा अमिबा शरीरातून आपल्या मेंदूत एन्ट्री घेतो आणि मेंदूसह मध्यवर्ती मज्जासंस्था निकामी करतो. 


या रोगाची लक्षणं कोणती?


ताप, डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणं ही या आजाराची मुख्य लक्षणं आहेत. या रोगाने संक्रमित रुग्णांचा मृत्यू होतो, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. दुर्मिळ मेंदूच्या संसर्गाचा मृत्यू दर 100% असल्याचं केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


या रोगाचा प्रतिबंध कसा करावा?


प्रायमरी अमिबीक मेनिंगोएन्सेफलायटिस (PAM) वर फार कमी उपचार आहेत, जर संसर्ग झाल्यावर लगेच याची माहिती मिळाली तरच या रोगावर उपचार होऊ शकतात. या संसर्गाशी लढण्यासाठी अँटीफंगल औषधांची शिफारस केली जाते. तर, संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा आहे. या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डबक्यातील अथवा दुषित पाण्यात डुबक्या मारणे, पोहणे टाळण्याची शिफारस डॉक्टरांकडून केली जाते. पाण्याच्या क्रियाकल्पांमध्ये भाग घेताना, नाकाचे क्लिप वापरणं किंवा आपलं डोकं पाण्याच्या वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.


हेही वाचा:


Yeola Special: शरद पवारांची येवल्यात सभा; पण तुम्हाला याच येवल्याचं महत्त्व माहीत आहे का? तर पाहा...