नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांच्यात भेट झाल्याचं अखेर काँग्रेसनं मान्य केलंय. पण या भेटीवरुन वाद निर्माण होत असल्याचं पाहून काँग्रेसनं यावर सारवासारव केली आहे.


राहुल गांधींनी फक्त चीनच नव्हे, तर भूतानचे राजदूत आणि माजी राष्ट्रीय सल्लागार शिवशंकर मेनन यांची भेट घेतल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय विविध देशांचे राजदूत काँग्रेस अध्यक्ष उपाध्यक्षांची भेट घेतच असतात अशी सारवासारवही केली आहे.

शनिवारी राहुल गांधींनी लुओ झुओई यांची भेट घेतल्याच्या बातम्या येत असताना काँग्रेसनं त्याला स्पष्ट नकार देत हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज हे स्पष्टीकरण देण्यात आलंय.

विशेष म्हणजे, दिल्लीतील चिनी दुतावासाने राहुल गांधी आणि लुओ झुओई यांच्या भेटीसंदर्भातील आपल्या वेबसाईटवरील (http://in.china-embassy.org) स्टेटमेंट नंतर डिलीट केल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं होतं. त्यामुळे राहुल गांधी आणि लुओ झुओई यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं.