हमीरपूर : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील एका तरुणीनं बंदुकीच्या धाकावर चक्क नवरदेवाला लग्नमंडपातून अपहरण केलं होतं. आता त्या तरुणीनं धडाक्यात लग्न केलं आहे. उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधील वर्षा साहूने अशोक नावाच्या तरुणाशी लग्न केलं आहे. तिने मे महिन्यात भर लग्नमांडवातून बंदुकीचा धाक दाखवत अशोकचं अपहरण केलं होतं.


वर्षा साहूच्या या धाडसी कृतीमुळं तिला साऱ्या पंचक्रोशीत हमीरपूरची 'रिव्हॉलव्हर राणी' म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं होतं. विशेष म्हणजे, तिने ज्याला लग्न मांडवातून पळवून आणलं होतं, तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा प्रियकर होता.

वास्तविक, वर्षा साहूला तिच्या प्रियकर अशोक यादवचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरल्याचं समजलं, त्यावेळी भयंकर संतापली होती. तिने रागाच्या भरात बंदूक घेऊन लग्न मांडवात प्रवेश केला. आणि चक्क प्रियकर नवरदेवाचं अपहरण केलं.

या घटनेनंतर हमीरपूरमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी वर्षचा कसून शोध घेऊन तिच्या प्रियकरासोबत अटक केली. त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दोघांनीही गावातील चौरादेवीच्या मंदिरात लग्न केलं. तिच्या लग्नासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.