नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. चिनी वृत्तपत्रातून भारताविरोधात सातत्यानं गरळ ओकण्याचं काम सुरु आहे. आजही चिनी मालकीच्या वृत्तपत्रानं भारताविरोधात आगपाखड करत, पाकिस्तानच्या विनंतीवरुन काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसवू अशी उघड-उघड धमकी दिली आहे. पण मुळात ही धमकी हिंदी महासागरात भारत, अमेरिका, जपान हे तिन्ही देश एकत्र आल्याचे पाहून चीन हडबडला असल्याचं बोललं जात आहे.


सध्या हिंदी महासागरात भारत, अमेरिका, आणि जपानच्या नौदलाचा युद्धाभ्यास सुरु आहे. या युद्धाभ्यासाला 'मालाबार' असं नाव देण्यात आलं आहे. तीन देशाच्या या संयुक्त युद्धाभ्यासासाठी भारतासह अमेरिका आणि जपानची लडाऊ विमानं चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल झाली आहेत. या युद्धाभ्यासात जवळपास 20 मोठे लढाऊ जहाज,  डझनभर फायटर जेट्स सहभागी असणार आहेत. ज्याच्या आवाजाने आताच चीनच्या मनात धकडी भरली आहे.

वास्तविक, भारत, अमेरिका आणि जपानमध्ये दरवर्षी अशाप्रकारचा युद्धाभ्यास होतो. पण यावेळी या युद्धभ्यासामुळे चीन गर्भगळीत झाला आहे. कारण हिंदी महासागरातील चीनची वाढती दादागिरी, त्यातच शेजारील देशांचे भूभाग बळकवण्याचे चीनचे मनसुबे यांना तडा जात आहे. या पार्श्वभूमीवरच तिन्ही देशांचा युद्धसराव चीनसाठी चोख प्रत्युत्तर देणारा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

भारत,अमेरिका आणि जपान दरम्यान आजपासून (10 जुलैपासून) हा युद्धसराव सुरु होत असून, तो 17 जुलैपर्यंत चालणार आहे. चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत हा युद्ध सराव चालेल. यात 20 युद्ध नौका, डझनभर फायटर जेट्स, 2 पाणबुड्या आदींचा समावेश असेल.

या युद्ध सरावात भारताच्या आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवरील प्रात्यक्षिकाचं विशेष आकर्षण असणार आहे. भारतीय नौदलात 2013 मध्ये आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेचा समावेश झाला. या युद्धनौकेवरील मिग-29 या फायटर जेट्सची प्रत्यक्षिकं ही सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी असतील.

तीन देशांच्या युद्धाभ्यासात भारतीय नौदलाची युद्धसामुग्री

  • एअरक्राफ्टची वाहतूक करु शकणारं INS विक्रमादित्य

  • INS सह्याद्री

  • INS किर्च

  • INS शक्ती

  • INS सातपुडा

  • P-8 I

  • चेतक हेलिकॉप्टर


तर अमेरिकेकडून सहभागी होणाऱ्या युद्धसामुग्रीमध्ये 1 लाख टन वजनी एअरक्राफ्टची वाहतूक करु शकणारी 'USS निमित्ज' ही महत्त्वाची युद्धनौका आहे. आण्विक ऊर्जेवर चालणारी ही युद्धनौका FA-18 फायटर जेट्स विमानांनी लॅस आहे.

अमेरिकेकडून सहभागी युद्धसामुग्रीमध्ये

  • USS  निमित्ज

  • लॉस एंजेल्स क्लास न्यूक्लियर अटॅक सबमरिन

  • गायडेड मिसाईल्स क्रूजर USS प्रिंसटन

  • गायडेड मिसाईल्स डिस्ट्रॉयर USS हॉवर्ड

  • P-8 A एअरक्राफ्ट


तर जपानकडून समावेश असलेल्यांमध्ये 27 हजार टन वजनी हेलिकॉप्टर कॅरिअर ' Izumo' ही सहभागी असेल. याशिवाय JS साजानामीही सहभागी असेल.

एक आठवडा हा युद्धाभ्यास चालणार असून, जगतले तीन मोठे नौदल आपलं कर्तुत्व सिद्ध करतील. त्यामुळे मित्र राष्ट्रांसाठी या युद्धसरावाचा थरार रोमांचकारी असेल. तर शत्रू राष्ट्रांच्या मनात धडकी भरवणारा हा युद्ध सराव असेल.

संबंधित बातम्या

...तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया


चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी


G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र


चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर


सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा


…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी


हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात