नवी दिल्ली : इंडियाज मोस्ट वाँटेड शोचा निर्माता आणि अँकर सुहेब इलियासीला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील कडकडडूमा कोर्टाने हा निर्णय दिला. 16 डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं होतं.


शिक्षा सुनावताच सुहेब कोर्टात जोरजोराने ओरडला. ''मी निर्दोष आहे, माझ्यावर अन्याय होतोय'', असं तो म्हणाला. शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सुहेबचं कुटुंब आणि त्याची पत्नी अंजूची आईही उपस्थित होती.

काय आहे प्रकरण?

सुहेबने 1998 साली इंडियाज मोस्ट वाँटेड शोची सुरुवात केली. काही दिवसातच हा शो लोकप्रिय झाला. सुहेब टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा बनला. मात्र 2000 साली असं काही घडलं, ज्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही.

आपल्या पत्नीने आत्महत्या केली असल्याचं सुहेबने त्याच्या मित्राला सांगितलं. मात्र अंजूच्या कुटुंबीयांनी सुहेबवर खुन केल्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास सुरु केला आणि मार्च 2000 साली सुहेबला अटक करण्यात आली.

काही दिवसातच सुहेबला जामीन मिळाला, मात्र अंजूच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली. 2014 साली हायकोर्टाने पोलिसांनी हत्येच्या कलमाखाली प्रकरणाचा तपास सुरु करण्याचे आदेश दिले. तपास सुरु करताच या प्रकरणात नवी माहिती समोर येत गेली.

सुहेब आणि त्याची पत्नी अंजू यांच्यात नेहमी वाद होत असत आणि त्यांचं पटत नव्हतं, हे चौकशीतून समोर आलं. हे सर्व पुरावे पोलिसांनी कोर्टासमोर सादर केले आणि सुहेबला दोषी ठरवण्यात आलं.

सुहेब आणि अंजू यांचा प्रेमविवाह झाला होता. अंजूच्या कुटंबीयांचा या लग्नाला विरोध होता. मात्र यानंतर दोघे लंडलना निघून गेले. कुटुंबीयांच्या विरोधानंतरही त्यांनी 1993 साली लग्न केलं.