नवी दिल्ली : सध्या देशात सरकार त्यांचे काम करत नाही. शेतकऱ्यांवर, सामान्य जनतेवर अन्याय सुरू असून, हा अन्याय कदापी सहन करणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले आहे. या घटनेवर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान एका बाजूला शेतकऱ्यांची माफी मागतात आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीमंडळात हत्याऱ्याला ठेवता असेही गांधी यावेळी म्हणाले. देशात शेतकऱ्यांच्या विरोधात जे केले जात आहे, ते आम्हाला मान्य नाही हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्याचे गांधी म्हणाले.


यावेळी भाजपविरोधी सर्वच पक्षांचे नेत उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा लगावला. देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन, राज्यात काय चाललय ते विचारत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या राज्यात खून, शेतकऱ्यांच्या हत्या होत आहेत, त्यावर ते काहीच बोलत नसल्याचे म्हणत राऊतांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांची हत्या करणारे मंत्रीमंडळात आहेत. त्यांच्यावर कोणताही कारवाई होत नाही. मात्र, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विरोधा पक्ष स्वस्त बसणार नसल्याचा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. तुम्ही आमचे १२ खासदार निलंबीत केले आणखी ५० खासदार निलंबीत करा, मात्र आम्ही प्रश्न विचारतच राहणार असेही ते म्हणाले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हा शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरल्याबद्दल संजय राऊत यांनी त्यांचे आभार देखील मानले.



लखीमपूर खेरी हिंसाचारचा मुद्दा विरोधकांनी संसदेत चांगलाच लावून धरला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. 3ऑक्टोबरला लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात गाड्यांच्या ताफ्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता.  यामध्ये 4 शेतकऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. जेव्हा शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांना चिरडत पुढे गेली. यानंतर हिंसाचार भडकला असल्याच शेतकऱ्यांनी म्हटले होते. 


 


महत्त्वाच्या बातम्या: